रेल्वे विभागाची संपत्ती चोरणारा चोरटा वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-लालवाडी जवळील रेल्वे वर्कशॉप येथून चोरी केलेल्या सहा हजार ब्रेकलाईनर पिन वजिरबादच्या गुन्हे शोध पथकाने पकडल्या. या प्रकरणाची पुढील कार्यवाही रेल्वे सुरक्षा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली.
19 जुलै रोजी वजिराबाद येथील पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे, पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, भाऊसाहेब राठोड, व्यंकट गंगुलवार, शेख इमरान, बालाजी कदम असे गस्त करत असतांना त्यांना पक्कीचाळ येथे एक माणुस सहा पोते घेवून थांबलेला दिसला. याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने स्वत:चे नाव किशन राम शिंदे (38) रा.रामलिला मैदान हिंगोली असे सांगितले. त्या पोत्यांमध्ये काय आहे याची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी पिन आढळून आल्या. ह्या पिन मी रेल्वे गोडाऊन लालवाडी येथून चोरल्या असल्याचे सांगितले. घडलेला प्रकार हा रेल्वे विभागाच्या संपत्तीशी निगडीत असल्याने किशन राम शिंदेला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरपीएफच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या पोत्यांमध्ये ब्रेक लाईनरच्या स्पीड पिन सहा हजार होत्या. त्यांची बाजारातील किंमत 36 हजार रुपये आहे. रेल्वेला ब्रेक लावतावेळी या पिनचा महत्वाचा उपयोग आहे.किशन राम शिंदेने मात्र ह्या पिन भंगरमध्ये विकण्यासाठी त्या चोरलेल्या आहेत. या पोत्यांमध्ये असलेल्या पिन रेल्वे ब्रेकलाईनर्सच्या स्पिड पिन असल्याची माहिती रेल्वेच्या तांत्रिक व्यक्तींनी सांगितली.गस्त करत असतांना आपल्या पोलीस ठाण्याशी काही संबंध नसलेल्या पण चुकीच्या व्यक्तींवर बारकाईने नजर ठेवून रेल्वे विभागाची संपत्ती चोरणाऱ्या व्यक्तीला पकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *