
डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल
नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या पोलीसांनी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त माणुसकीची जाण ठेवून एका जखमीसाठी केेलेली मेहनत भरपूर मोठी आहे. आज त्या व्यक्तीचा मनगटापासून तुटलेला हात डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांनी जोडून दिला आहे. आज तो आपल्या हातांच्या बोटांची हालचाल करीत आहे. याबद्दल मला मनस्वी खुप आनंद होत असल्याचा आनंद पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केला.
पोलीस ठाणे भाग्यनगरच्या हद्दीत 20 जुलै 2023 रोजी रात्री 8.30 वाजता त्रिशरण कैलास थोरात (37) रा.चिखली (खु) यास सुरज संजय बसवंते, आकाश भागोराव रणमले आणि विनय राम जाधव या तिन युवकांनी तलवारीने मारहाण केली. या हल्ल्यात त्रिशरण थोरातचा डाव्या हाताचा मनगटापासूनचा भाग वेगळा झाला. पोलीसांनी त्यास अगोदर शासकीय रुग्णालयात नेले. त्याच्या हाताचा पंजा गॅरीबॅगमध्ये घालून नेण्यात आला होता. परंतू त्यासाठी प्लॉस्टीक सर्जनची गरज होती. पण नांदेड, औरंगाबाद, मुंबई, पुणे या सर्व ठिकाणी याबद्दलची माहिती घेतली असता त्रिशरण थोरातला मुंबई-पुण्याला नेणे अत्यंत अवघड होते.
त्यानंतर आम्ही नांदेडचे अस्थि रोग तज्ञ डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांच्यासोबत संवाद साधला. त्याच रात्री डॉ.पालीवाल यांनी 8 तास शस्त्रक्रिया करून जखमी त्रिशरण थोरातचा हात जोडला आहे. आज त्याच्या डाव्या हाताच्या बोटांची हालचाल होत आहे. हा घटनाक्रम एवढा संवेदनशिल आहे की, एका मजुरी करणाऱ्या व्यक्तीचा हात तुटला तर त्याच्या भविष्यात, त्याच्या जीवनावर त्याचे काय परिणाम होतील याचे भान ठेवूनच पोलीसांनी घेतलेल्या मेहनतीला डॉ. पालीवाल यांनी दिलेला प्रतिसाद महत्वपूर्ण ठरलेला आहे. माझ्या पोलीस विभागाने केलेले हे काम मला मनस्वी आनंद देत आहे. या संदर्भाने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, अद्याप डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांनी आम्हाला पैसे मागितले नाहीत.पण पैसे देण्याची गरज पडेल तेंव्हा आम्ही पोलीस अधिकारी मिळून शक्य ती मदत त्रिशरण थोरातला देणार आहोत असे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.या प्रकरणात दोन आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 चा गुन्हा दाखल केलेला आहे.
