नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. यात जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, बिलोली, किनवट, माहूर या भागात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. याभागातील पिकांसह जिवीत हाणी मोठ्या प्रमाणात झाली. पालकमंत्री महाजन यांनी रविवारी पुर परिस्थितीची पाहणी करून जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या.
पालकमंत्री महाजन यांनी रविवारी मुखेड, बिलोली आणि देगलूर या भागातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला व प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी आणि नागरीकांशी त्यांनी संवाद साधला. शासन आपल्या पाठीमागील आहे असा विश्र्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. या आढावा बैठकीत त्यांनी कोणत्याही प्रकारचे हार किंवा सत्कार स्विकारला नाही. त्यांच्या या पाहणी दौऱ्यात खा.प्रताप पाटील चिखलीकर आ.राम पाटील रातोळीकर, भाजपा प्रदेश सचिव देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी आ.सुभाष साबणे, बिलोली भाजपा तालुकाध्यक्ष श्रीनिवास नरवाडे, जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, माणिकराव लोहगावे, राजेंद्र तोटावाड यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री महाजन यांनी जिल्हा प्रशासनाची नांदेड विमानतळ येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णलवार यांच्यासह आदी जण उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी प्रशासनाला आदेश देवून योग्य त्या सुचना दिल्या. या संदर्भाचा अहवाल शासनाला सादर करा अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या
.