
नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने 22 जुलै रोजी कॉंगे्रसचे माजी नगरसेवक अब्दुल हबीब अब्दुल रहिम बागवान यांना शिमला पोलीसांनी पकडून नेल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याबद्दल आज त्यांचे बंधू अब्दुल शकील बागवान यांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेल्या निवेदनावरून भयंकर प्रकार समोर आला आहे.त्यांच्या बंधू हबीब बागवान यांना शिमला न्यायालयातही हजर केले नाही आणि त्यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही त्यामुळे त्यांची अटकच बेकायदेशीर आहे म्हणून पोलीस अधिक्षक नांदेड यांनी स्वत: लक्ष घालून भारतीय संविधानाने दिलेल्या हमीनुसार त्याचे रक्षण करावे आणि तो परत सुरक्षीत घरी येईल यासाठी मदत करावी.
मुळात 19 जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शिमला पोलीसांनी अब्दुल शबीब अब्दुल रहिम बागवान यांना पकडून नेले होते. त्याबद्दलची माहिती त्यांनी नांदेड पोलीसांना सविस्तर दिली नाही. मी त्यांच्या नंतर तिकडे गेलो असतांना तेथे गुन्हा क्रमांक 6/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420 आणि 506 नुसार कोणी अनुप पाल नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरुन 20 जून 2023 रोजी दाखल करण्यात आला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग शिमला यांच्याकडे हा एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या पोलीस प्राथमिकीमध्ये अब्दुल हबीब बागवान यांचे नाव सुध्दा नसतांना त्यांना अटक करण्यात आली. मी त्यानंतर 21 जुलै रोजी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी थीयॉंग (शिमला) येथे गेलो. पण माझा भाऊ हबीब बागवान यांना त्या कोर्टात हजरच करण्यात आले नाही.मी त्याबद्दल शिमला पोलीसांना सुध्दा माहिती विचारली पण ते सुध्दा मला काहीच प्रतिसाद देत नव्हते म्हणून मी 21 जुलै रोजी तेथे माझ्या बंधूबद्दल अर्ज देवून परत नांदेडला आलो आहे. माझा भाऊ अब्दुल हबीब याच्या जीवनाबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल आम्ही चिंतीत आहोत असे या निवेदनात लिहिले आहे.
याबद्दल अजून खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला हबीब बागवानला घेवून शिमला (हिमाचल) पोलीस नांदेड परत गेले. शिमला पोलीसांनी नांदेड येथे न्यायालयात प्रवासाचे वॉरंट घेतले नव्हते. त्यांनी ते वॉरंट ईटारसी कोर्टातून घेतले. पुढे धोलपुर (राजस्थान) येथून अब्दुल रहिम अब्दुल बागवान फरार झाल्याचा गुन्हा शिमला पोलीसांनी भरतपूर (राजस्थान) या पोलीस ठाण्यात दाखल केल्याची माहिती आहे. शिमला पोलीस विभागाचे तपासीक अंमलदार नागदेव यांचा मोबाईल नंबर प्राप्त झाला होता. त्यासंदर्भाने वास्तव न्युज लाईव्हने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी फोनच उचलला नाही. ज्या परिस्थितीप्रमाणे माहिती प्राप्त होत आहे. त्याप्रमाणे परिस्थिती अवघडच आहे. पुढे कायद्याच्या प्रक्रिया राबवतांना पारदर्शकता आवश्यक आहे असेच म्हणावे लागेल.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/22/माजी-कॉंग्रेस-नगरसेवकाला/