बाजारात युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध,शेतकऱ्यांनी युरिया खताची काळजी करु नये – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे

नांदेड (जिमाका)- बाजारात युरीया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया खताची काळजी करु नये. तसेच रासायनिक खत खरेदी करताना खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर निविष्ठा खरेदीची सक्ती करीत असल्यास उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तात्काळ तक्रार नोंदवावी. अथवा जिल्हा तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक 9673033085 ( व्हाटसअप क्र. ), 02462-284252 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

सध्या खरीप हंगाम पेरणीचे कामे पुर्ण झाले असुन जिल्हयातील शेतकरी खते खरेदीसाठी बाजारात चाचपणी करीत आहेत. शेतकऱ्यांनी गरजेनुसार व कृषिविद्यापीठाच्या शिफारस मात्रा नुसार पिकांना लागणाऱ्या खतांची खरेदी करावी. जिल्ह्यात आज रोजी युरीया खताचा 6 हजार 680 मे.टन खतसाठा उपलब्ध असुन 5 हजार 800 मे.टन खतसाठा पुढील 6 ते 7 दिवसात संभावित उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही भुलथापाला बळी न पडता युरीया खताची काळजी करु नये.

 

शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट खतांचा संतुलित वापर करावा. विद्यापिठाच्या शिफारस मात्रेनुसार खत नियोजन करताना कमी खर्चात खतांचे नियोजन होईल याची काळजी घ्यावी. एकाच कोणत्याही खताची आग्रह न धरता उपलब्ध खतापासुन पिकास शिफारस मात्रेप्रमाणे खताचा वापर करावा. जिल्हयात बाजारात आज पुढील प्रमाणे युरीया खत साठा उपलब्ध आहे. आज रोजी उपलब्ध झालेला युरीया आरसीएफ (RCF) 2 हजार 250 मे. टन खताचा साठा असून संभावित येणारा रॅक कृभको 2 हजार 300 मे. टन आहे. आयएफएफसीओ (IFFCO)2 हजार मे. टन साठा उपलब्ध असून संभावित येणारा रॅक नागार्जुन 2 हजार 200 मे. टन आहे. आयपीएल (IPL)1 हजार 600 मे. टन साठा उपलब्ध असून संभावित येणारा रॅक चंबळ 1 हजार 300 मे. टन साठा आहे. संरक्षित केलेल्या युरीया साठया पैकी वितरीत साठा 880 मे. टन आहे. आज रोजी एकूण उपलब्ध साठा 6 हजार 680 असून संभावित येणारा रॅक साठा 5 हजार 800 आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी युरीया खताची काळजी करु नये असे कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *