नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या पत्नीला मोबाईलवर का बोलतो याचा जाब विचारता तेंव्हा पत्नी व पती दोघांवर हल्ला करून एकाने पत्नीचा खून केला आणि पतीला गंभीर जखमी केले. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.आर.धामेचा यांनी जन्मठेव आणि 8 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
रावसाहेब केशव पांचाळ (40) रा.उमरी ता.अर्धापूर ह.मु.मालेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 एप्रिल 2020 रोजी मी, माझी पत्नी छायाबाई व मुलगा सुहास असे तिघे मिळून एका दुचाकीवरून उमरी येथे शेतातील कामासाठी गेलोत. माझ्या शेजारी प्रभु मारोती गुंडले यांचे शेत आहे. प्रभु गुंडले माझ्या फोनवर बोलून माझ्या पत्नीला त्रास देत असे म्हणून त्या दिवशी आम्ही फोन बंद ठेवला. दिवसभर काम करून सायंकाळी परत मी, पत्नी छायाबाई, मुलगा सुहास एकाच दुचाकीवरून घराकडे जात असतांना मला मुलाने सांगितले की, आपल्या पाठीमागे प्रभु गुंडले आपल्या मोटारसायकलची लाईट बंद करून येत आहे. तेंव्हा मी मालेगावजवळच्या सबस्टेशनसमोर माझी दुचाकी उभी केली. मागून आलेल्या प्रभु मारोती गुंडलेने आपल्या हातातील ऊस कापण्याच्या कत्तीने माझ्या पत्नीच्या तोडांवर आणि हनवटीवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे ती जागीच मरण पावली. सोबतच माझ्यावरही हल्ला करून माझ्या कपाळावर आणि डोक्यात कत्तीने मारहाण करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घडलेली घटना माझ्या मुलाने पाहिलेली आहे.
याप्रकरणी अर्धापूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307 नुसार गुन्हा क्रमांक 119/2020 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरिक्षक एस.के.सुरवसे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हा सत्र खटला क्रमांक 98/2020 म्हणून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.आर.धामेचा यांच्यासमक्ष चालला. या खटल्या दहा साक्षीदारांनी आपे जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे प्रभु मारोती गुंडलेला छायाबाई पांचाळचा खून करणे आणि रावसाहेब पांचाळवर जिवघेणा हल्ला करणे या दोन्हीसाठी दोषी मानले. प्रभु मारोती गुंडलेला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे जन्मठेप आणि 5 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 307 प्रमाणे वेगळी सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा प्रभु गुंडलेला एकत्रित भोगाच्या आहेत. या खटल्या सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.आर.एन. देशमुख यांनी काम पाहिले. पोलीस ठाणे अर्धापूरचे पोलीस अंमलदार बी.एच.सोनकांबळे यांनी पैरवी अधिकाऱ्यांचे काम पुर्ण केले.
माझ्या पत्नीला मोबाईलवर का बोलतो याचा जाब विचारल्याने पत्नीचा खून आणि पतीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्याला जन्मठेप