नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोक्सो गुन्ह्यातील दोषारोप पत्र 24 तासात न्यायालयात सादर करून आपले पोलीस अधिक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाब्बासकी मिळवली आहे.
दि.30 जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 6 वर्षीय बालिकेवर सायंकाळी 7 वाजता अत्याचार झाला. तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घराच्या गच्चीव नेऊन तिच्यासोबत अभद्र व्यवहार केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा क्रमांक 554/2023 दाखल केला.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांच्याकडे दिली. त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार ज्ञानोबा कौठेकर, कानगुले, जाधव, सांगळे, फय्याज सिद्दीकी यांना मदतीसाठी दिले.
रात्री उशीरापर्यंत या पथकाने भरपूर मेहनत घेतली, आरोपीला अटक केले आणि सकाळी पुन्हा लवकरात लवकर कामाची सुरूवात करून आज 31 जुलै रोजी आरोपी अमोल वामन तारू (34) यास दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले. एवढी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे यांच्यासह नांदेड ग्रामीण पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटै, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक आदींनी कौतुक केले आहे. भविष्यात अशाच कामगिरीची अपेक्षा सुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांची दखलपात्र कामगिरी ; पोक्सोचा आरोपी पकडून 24 तासात दोषारोपपत्र दाखल