नांदेड(प्रतिनिधी)-वाद मिटविण्यासाठी पुणेगाव येथून मुगटला एका मित्राला बोलावून तेथे तलवारीने भोसकून त्याचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. मारेकरी असलेल्या दोन जणांना मुदखेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणेगाव येथील शिवराज बापूराव पुयड (23) याचा आणि एका मित्राचा दोन दिवसांपुर्वी वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी वाद झालेल्या मित्राने शिवराज पुयडला 2 ऑगस्ट रोजी मुगट येथे बोलावले. वाद मिटवता मिटवता पुन्हा वाद झाला आणि या वादातून आपल्याच मित्राच्या पोटात आणि हातावर तलवारीने वार केल्यामुळे शिवराज पुयड रक्तबंबाळ होवून खाली पडला आणि तेथेच मरण पावला.
रामदास नारायण पुयड यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुदखेड पोलीस ठाण्यात शिवराज पुयडच्या दोन मित्रांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. मुदखेडचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे यांनी या प्रकरणी धावपळ करून दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. आज दुपारी अत्यंत गंभीर परिस्थितीत पुणेगाव येथे शिवराज बापूराव पुयडवर अंतिम संस्कार करण्यात आले. भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन यांनी भेट दिली. शिवराज पाटील पुणेगावकरचा खून करणारे जितेश ढगे आणि राहुल कल्याणे दोघे रा.मुगट हे सध्या मुदखेड पोलीसांच्या ताब्यात आहेत.
