तेलंगणा राज्यातील सचखंड श्री हजुर साहिबजींच्या मालकीच्या जागेचे मोजमाप 45 दिवसात होणार ; 110 वर्षानंतर आले यश

नांदेड(प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील सचखंड श्री हजुर साहिबजींना 110 वर्षापुर्वी दान दिलेल्या जागेचे मौजमाप 45 दिवसांत करून द्यावेत असे आदेश तेलंगणा राज्यातील उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती बी. विजयसेन रेड्डी यांनी जारी केले आहेत. करीमनगर येथील सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांच्या मेहनतीला आलेले हे यश आहे.
तेलंगणा राज्यातील आब्बापुरम गाव, तहसील (मंडल) मुलूगु जि.जुनावरंगल आजचा जिल्हा मुलूगु राज्य तेलंगणा येथे 110 वर्षापुर्वी सरदार निहालसिंघ नावाच्या व्यक्तीने आपल्या मालकीची 162 एकर 23 गुंठे शेत जमीन नांदेडच्या सचखंड श्री हजुर साहिबजी यांच्या चरणात अर्पण केली. अर्थात दान केली. 110 वर्ष या जागेकडे कोणीच पाहिले नाही. त्यानंतर गुरुद्वारा बोर्डात अध्यक्ष पदावर डॉ.भुपेंद्रसिंघ मन्हास, उपाध्यक्ष गुरविंदरसिंघ बावा आणि डॉ.पी.एस.पसरीचा यांनी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने करीमनगर येथील सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांना सचखंड श्री.हजुर साहिबजी यांच्या मालमत्ता कोठे कोठे आहेत, त्या मालमत्तांबद्दल आजची परिस्थिती काय आहे आणि त्या मालमत्ता पुन्हा सचखंड श्री हजुर साहिबजी अर्थात गुरूद्वारा बोर्डाच्या मालकीच्या झाल्या पाहिजेत यासाठी अधिकार पत्र दिले. सरदार मनजितसिंघ अशा अनेक संपत्तींवर काम करत आहेत. त्यात त्यांना हे पहिले यश आहे.
तेलंगाणा राज्यातील उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 12576/2022 दाखल करण्यात आली. ज्यामध्ये मुळ मागणीप्रमाणे जुना सर्व्हे नंबर 83 आणि नवीन सर्व्हे नंबर 40 मधील सचखंड श्री.हजुर साहिबजी यांच्या मालकीची 162 एकर 23 गुंठे जागा मोजुन देण्याचा विषय होता. ही याचिका सादरकर्ते सरदार मनजितसिंघ जगनसिंघ हे आहेत. यांच्यावतीने न्यायालयात ऍड.कुरेशी यांनी बाजु मांडली. सरकार पक्षाच्यावतीने ऍड.वाय.रविंद्र प्रसाद यांनी सांगितले की, ही जागा सन 2009 पासून राखीव जंगल आहे. आता त्यात भरपूर लांब वेळ गेलेला आहे.त्यामुळे आता सर्व काही होणे अवघड आहे.
न्यायमुर्ती बी.विजयसेन रेड्डी यांनी आदेश देतांना जंगल विभाग आणि इतर संबंधीत प्रत्येक व्यक्ती जो या जमीनीशी संबंधीत आहे त्यांनी आदेश प्राप्त झाल्यानंतर 45 दिवसांत या जमीनीची मोजणी करून द्यावी. म्हणजे आपलीच जागा 110 वर्षानंतर आपल्याला मिळणार आहे असा या आदेशाचा अर्थ आहे. यासाठी मेहनत घेतलेल्या सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी सांगितले की, गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भुपिंदरसिंघ मिन्हास, उपाध्यक्ष गुरविंदरसिंघ बाबा आणि प्रशासक डॉ.पी.एस.पसरीचा यांनी माझ्यावर दाखवलेला विश्र्वास आणि मला दिलेले अधिकार या आधारावर मीही लढाई लढली आहे. यापुढे सुध्दा माझ्या मृत्यूपर्यंत गुरुजींची सेवा करण्यासाठी मी कटीबध्द आहे.
नांदेडच्या राजकारणात एक दुसऱ्याला कमी दाखवणे आणि मी कसा मोठा आहे हाच विषय नेहमी दिसतो. त्यापेक्षास्थानिक राजकारण वगळून सर्व शिख बांधवांनी गुरू घराच्या सेवेसाठी एकत्रित यावे म्हणजे आज एका लढाईला यश आले. भविष्यात सर्वांची एकजुट झाली तर अनेक लढायांमध्ये यश येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *