नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र शासनाने देशातील गेल्या अनेक वर्षापासून अविकसीत असणाऱ्या रेल्वे स्थानकातील विकासासाठी अमृत भारत योजना सुरू केली आहे. यामध्ये नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या 11 रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार असल्याची माहिती निती सरकार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
या योजनेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.6 ऑक्टोबर रोजी ऑनलाईनच्या माध्यातून करणार आहेत. यामध्ये नांदेड रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या 11 रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. यात परभणी, नगरसोल, वाशिम, हिंगोली, आदीलाबाद, सेलू, मुदखेड, पुर्णा, परतुर, गंगाखेड आणि किनवट या रेल्वे स्थानकाचा यात समावेश आहे. हे काम मार्च 2024 अखेरपर्यंत पुर्ण करण्याचे उद्दीष्टे ठेवण्यात आले आहेत. या कामावर 243.60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. या कामातून प्रवाशांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सुविधेत लिफ्ट, स्वच्छतागृह, प्लॅटफार्म दुरूस्ती, प्रवाशासाठी आसन व्यवस्था, गाड्यांचे वेळापत्रक अशा विविध सुविधा या स्थानकावर पुरविल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्यात बदल करून त्या रेल्वे स्थानकांचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम या योजनेतून केल जाणार आहे.
याच विभागाअंतर्गत येणाऱ्या जालना, औरंगाबाद या दोन रेल्वे स्थानकांच्या कामांनाही आता गती देण्यात आली आहे. विशेषता: या स्थानकाचे आधुनिकीकरण झाले असले तरी पुन्हा अधिकची भर घालून मोठ्या स्टेशनच्या बरोबरीने या स्टेशनवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जालना रेल्वे स्थानकासाठी 198 कोटी तर औरंगाबाद रेल्वे स्थानकासाठी 240 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पुर्ण करायचे आहे. या स्थानकावर दर्जेदार सुविधा प्रवाशांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने या दोन रेल्वे स्थानकांचा समावेश केला असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाच्या निती सरकार यांनी पत्रकार परिषदे दिली.