नांदेड (जिमाका)- मराठवाडा मुक्ती संग्रामच्या 75 व्या वर्षानिमित्त हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा होत आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सप्तरंग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आंतरशालेय व अंतर महाविद्यालय स्पर्धा 14 ते 16 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा उद्देश मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा व त्यांना माहिती व्हावी. या हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी यांनी दिली.
यानिमित्त आंतर महाविद्यालयासाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. यात विविध विषय दिले असून याची नोंदणी 10 तारखेपर्यंत करावयाची आहे. या स्पर्धेमध्ये हिंदी मराठी इंग्रजी कुठल्याही भाषांमध्ये वक्तव्य करता येईल. आंतरशालेय स्पर्धेमध्ये गट आठवी ते दहावी गट पाचवी ते सातवी यांच्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. चित्रकला आणि निबंधाचे विषय प्रत्येक शाळेला कळविण्यात आलेले आहेत. निबंध आणि चित्रकला पाठवून देण्यासाठी 10 ऑगस्ट 2023 अंतिम मुदत राहील. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा 15 ऑगस्ट रोजी कुसुम सभागृह येथे सकाळी 11 वा. आयोजित केली आहे. या सर्व बाबींचे विषय माहिती करून घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी 7057514348 या क्रमांकावर संपर्क करावा. यामध्ये बक्षीस म्हणून विविध रोख रक्कम ठेवण्यात आली आहे. तसेच प्रशस्तीपत्र गौरवपत्र असे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले आहे.