नांदेड(प्रतिनिधी)-2 लाख रुपये घेवून खोटे सोने देणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाला माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 तासात गजाआड करून आपल्या तत्परतेचा परिचय दिला आहे.
काल दि.3 ऑगस्टच्या रात्री संतोष अनंदराव जाधव रा.केगाववडगाव ता.नायगाव जि.नांदेड यांनी माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घटनेची माहिती तक्रारीच्या स्वरुपात दिली. त्यानुसार मौजे घोटका ता.लोहा येथे 2 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास सोन्याचा लोटा देतो म्हणून आंबादास मोतीराम सुरनर रा.घोटका ता.लोहा आणि शिवनंदा पांडूरंग कल्याणकर रा.गोगदरी ता.कंधार या दोघांनी संतोष जाधवकडून 2 लाख रुपये घेतले. पण पिवळ्या धातुचे दोन लोटे आणि बाजारू नकली चैन देवून त्यांची 2 लाख रुपयांचा फसवणूक केली. या प्रकरणी माळाकोळी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 108/2023 दाखल केला. त्यात भारतीय दंड स्ंहितेची कलमे 420 आणि 34 जोडण्यात आली. या गुन्ह्याचा तपास माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मुंडे यांच्याकडे देण्यात आला.
गुन्हा दाखल होताच माळाकोळी पोलीसांनी एकत्रितपणे केलेल्या मेहनतीनुसार 2 लाखांची फसवणूक करणारी महिला शिवनंदा पांडूरंग कल्याणकर रा.गोगदरी ता.कंधार आणि पुरूष आंबादास मोतीराम सुरनर रा.घोटका ता.लोहा या दोघांना 4 ऑगस्टच्या रात्री 1 वाजता अटक केली आहे. माळाकोळी पोलीसांनी केलेल्या मेहनतीला दोन तासातच यश आले आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना माळाकोळी पोलीसांनी गजाआड केेले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माळाकोळी पोलीसांचे कौतुक केले आहे.
2 लाख घेवून खोटे सोने देणाऱ्या दोघांना माळाकोळी पोलीसांनी 2 तासात जेरबंद केले