नांदेड (प्रतिनिधी)-ज्या पध्दतीने त्रिशरण थोरातचा हात तुटला होता अशा परिस्थितीतल्या रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहचवले तर त्याचा तुटलेला अवयव जोडणे डॉक्टरांसाठी सोपे असते. समाजाने लवकरात लवकर आपला रुग्ण रुग्णालयात जाईल, ज्या ठिकाणी सुविधा आहेत ही महत्वाची जबाबदारी पार पाडली तर डॉक्टरांना रुग्णांसाठी थोडीशी मेहनत करावी लागते आणि ती त्याच्या जीवनासाठी महत्वाची असते असे प्रतिपादन आयोति पत्रकार परिषदेत यशोसाई क्रिटीकल केअर सेंटरमधील डॉ.सुशांत चौधरी यांनी केले.
या पत्रकार परिषदेला डॉ.उमेश देशपांडे, डॉ.ऋतुराज जाधव, डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल, डॉ.राजेश अग्रवाल, डॉ.सुशांत चौधरी, डॉ.संगीता अग्रवाल, डॉ.प्रशांत भट्टड, डॉ.प्रमोद चिखलीकर, डॉ.सुवर्णा गुणावत, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह या शस्त्रक्रियेसाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 जुलै रोजी एका कामगार व्यक्तीचा हात तलवारीने मनगटापासून तुटून खाली पडला होता. ही बाब पोलीसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णाला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णाला औरंगाबाद किंवा हैद्राबाद, मुंबई येथे हलविण्यात यावे अशा सुचना दिल्या होत्या. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यशोसाई येथील डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांना संपर्क साधून या बाबतची माहिती दिली. डॉ.पालीवाल यांनीही कोकाटे यांना याबाबतची माहिती मी तुम्हाला 10 मिनिटानंतर देवू शकतो असे म्हणून त्यांनी आपल्या रुग्णालयात काही डॉक्टरांशी संपर्क केला आणि सर्वांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याचे आव्हान स्विकारले. त्यानंतर डॉ.पालीवाल यांनी पोलीस अधिक्षक यांना फोन करून रुग्णास यशोसाई येथे त्वरीत घेवून येण्यास सांगितले. यावेळी मी आणि डॉ.सुशांत चौधरी आणि डॉ.संगीता अग्रवाल हे घरी होतो.आमच्या अगोदर रुग्ण दवाखान्यात दाखल झाला. यानंतर त्याच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. रुग्णाला कोणत्याही प्रकारची रोग नसल्यामुळे आणि वेळेच्या अगोदरच सुविधा असलेल्या रुग्णालयामध्ये दाखल झाला. रुग्णाला शस्त्रक्रिया करतांना त्याचा रक्तदाब, शुगर, आणि शुध्दी बरोबर असली तर रुग्णावर शस्त्रक्रिया करणे सहज असते. त्याप्रमाणे रुग्णाने प्रतिसाद दिला आणि आम्ही शस्त्रक्रियेची तयार केली.
रुग्णावर रात्री 11 वाजता शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात झाली ती पहाटे 5.30 वाजेपर्यंत चालली. अगोदर अस्थीरोग तज्ञ डॉ.पालीवाल यांनी हाडे जोडली. त्यानंतर प्लॉस्टीक सर्जन डॉ.सुशांत चौधरी यांनी 10 नसा, 3 रक्त वाहिन्या, 2 नाड्या जोडल्या आणि त्यानंतर त्वाचा जोडली. तरीही देखील आमच्या सर्व टिमच्या मनात एक भिती कायमची होती.शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण तीन ते चार दिवसानंतर त्याच्या नसा, हाताच्या बोटांची हालचाल आणि कोणत्याही प्रकारच्या जखमेवर काळवटपणा जाणवला नाही यामुळे आता हा रुग्ण नव्याने आपले आयुष्य जगू शकतो अशी उमेद यशोसाई क्रिटीकल केअर हॉस्पीटलच्या मनात निर्माण झाली. या अगोदरही आम्ही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. पण ही मात्र शरिरापासून वेगळ झालेल अवयव जोडण्याची शस्त्रक्रिया लाखातली एक आहे.
या प्रसंगी या शस्त्रक्रियेसाठी मेहनत घेतलेले डॉ.उमेश देशपांडे, डॉ.अश्विनकुमार, डॉ.सुवर्णा गुणावत, डॉ.मोहन यांनी या शस्त्रक्रियेसाठी आम्ही काय-काय मेहनत घेतली याचे वर्णन केले. मोठ्या दवाखान्यांमध्ये खर्च पण मोठा असतो. या खर्चासाठी पोलीस विभाग तयार होता. पण आम्ही पोलीसांनी एवढी मोठी तयारी दाखवली म्हणून आम्ही सुध्दा ही शस्त्रक्रिया मोफत केली आहे.रुग्णाला लागलेल्या औषधीचा खर्च मात्र पोलीसांनी दिलेला आहे. यामुळे आम्ही हॉस्पीटलच्यावतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.
आज त्रिशरन थोरातचा हात, बोटे आणि मनगट हलत आहे. काही दिवसांनी त्याच्या मनगटात आणि हातात टाकलेले रॉड काढल्यानंतर त्याच्यावर फिजिओथेरीपी करण्यात येईल आणि तो पुर्वीप्रमाणे तो दररोजचे काम करु शकेल असा विश्र्वास आम्हाला वाटत आहे. एखाद्या रुग्णाला असा प्रकार झालाच तर त्याचा तुटलेला अवयव स्वच्छ करून बर्फाच्या शेजारी ठेवून दवाखान्यात आणला पाहिजे तर तो जोडण्यात यश येतो ही माहिती जगापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही आपल्याला सांगत आहोत.
त्रिशरण थोरातसाठी “यशोसाई हॉस्पीटल’ देवदुतच