नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा मध्यवर्त्ती सहकारी बॅंकेमध्ये खोटे एटीएम कार्ड बनवून शेतीच्या विविध योजनांचे पैसे काढून घेण्याचे एक रॅकेट सुरू आहे. यातून शासनाचा कोट्यावधीचा निधी चोर खात आहेत. असाच एक प्रकार समोर आल्यानंतर ही सर्व माहिती मिळाली. रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) नांदेड महिला जिल्हाध्यक्षा सौ.निशा विजय सोनवणे यांच्याकडे एटीएम नसतांना त्यांच्या खात्यावरील 19 हजार 800 रुपये एटीएमच्या माध्यमातून किवळा ता.लोहा येथील एटीएम सेंटरमधून काढल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
सौ.निशा विजय सोनवणे यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नांदेड यांना दिलेल्या अर्जानुसार त्यांचे शेत सावरगाव दक्षिण ता.उमरी या भागात आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा उमरी येथे त्यांनी आपले खाते उघडले आहे. त्या खात्याचा क्रमांक 112811111146605 आहे. या खात्याचे त्यांच्याकडे पासबुकही नाही आणि एटीएम कार्डही नाही. तसेच दुसरे खाते आहे ज्याचा क्रमांक 112811111026078 आहे. या खात्याचे त्यांच्याकडे एटीएम कार्ड आणि पासबुक आहे.या खात्यावर अनुदानाची कोणतीही रक्कम जमा झाली नाही म्हणून त्या खात्यावर कोणताही व्यवहार झालेल नाही.
माझ्या खात्यावर जमा असलेले 19 हजार 800 रुपये उचलण्यासाठी 4 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा बॅंक शाखा उमरी येथ गेलो असतांना बॅंकेचे शाखा व्यवस्थापक यांनी खात्यात पैसे नसल्याचे सांगितले. त्या खात्याचे माझ्याकडे एटीएम कार्ड नसतांना माझे पैसे एटीएम कार्डद्वारे उचलल्याचे सांगण्यात आले. ती रक्कम किवळा गावाच्या एटीएम मशीनमधून उचलेली आहे. माझ्याकडे एटीएम कार्ड नसतांना, तुम्ही दिलेले नसतांना माझी रक्कम गायब कशी झाली असा प्रश्न विचारल्यावर शाखा व्यवस्थापक उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. एटीएम कार्ड देतांना खातेदाराची तपासणी होते. त्याची स्वाक्षरी व्यवस्थापकाच्या समोर करून घेतली जाते तरी पण माझ्या नावाचे खोटे एटीएमकार्ड बनविण्यात आले आहे.
प्रश्न फक्त सौ.निशा विजय सोनवणे यांच्या 19 हजार 800 रुपयांचा नाही. कारण शेतकऱ्यांच्या खात्यात पिक पडीचे अनुदान जमा होते, दुष्काळ अनुदान जमा होते, पण काही शेतकरी 2 ते 4 वर्ष या अनुदानाची तपासणी करत नाहीत. काही शेतकरी गाव सोडून दुसरीकडे गेलेेले आहेत. काही शेतकरी मरण पावलेले आहेत. म्हणून शाखा व्यवस्थापक आणि काही दलाल मिळून अशा खात्यांना शोधून त्यातील शासकीय अनुदानाची अशी चोरी करत आहेत. यावर नक्कीच जरब बसण्याची गरज आहे. नसता शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी असेच चोरटे आणि दलाल खाऊन जातील मग हात मळण्याशिवाय काही शिल्लक राहणार नाही.
शासनाच्यावतीने पिक पडीचे पैसे, दुष्काळ अनुदानाचे पैसे जेंव्हा येतात ते नांदेड जिल्ह्यातील जवळपास 66 शाखांमध्ये येतात. एका शाखेमध्ये जवळपास 50 लाख रुपये येत असतील तर 66 शाखांमधील त्याचा गुणाकर किती होतो हे करणे आमच्यासाठी अवघड आहे. बॅंकेत विचारणा केली तर बॅंकेचे व्यवस्थापक सांगतात जा कोठे तक्रार करायची ते कर तुझे पैसेच आले नाहीत, तुम्ही उचलले आणि पुन्हा खोटे बोलता असे करून शेतकऱ्याला दबाव आणतात आणि कोणताही शेतकरी तक्रार करत नाही. शेतकऱ्यांवर नेहमीच त्रासच असतो आणि बॅंक प्रकरणात सुध्दा शेतकरी पुन्हा त्रासलेलाच आहे. त्याचे रडणे कोणी तरी ऐकावे म्हणूनच आम्ही हा शब्द प्रपंच केला आहे.
