स्वातंत्र्याचे मूल्य ओळखून लोकसहभागाच्या कर्तव्याचेही पालन आवश्यक- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

▪️‘मेरी माटी मेरा देश’ व जागतिक आदिवासी दिनानिमित्त तेलंगणाच्या काठावर आदिवासी मांडवीत जागर  

▪️जनतेच्या आरोग्याला सशक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प

नांदेड (जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन आपण आता सांगते कडे वळलो आहोत. एक देश म्हणून आपण प्रगतीचे विविध टप्पे पार करताना आता नागरिक म्हणून आपल्या हक्कासह कर्तव्याचे अधिक सजग भान ठेवले पाहिजे. अतिदुर्गम भागातील, डोंगर-दऱ्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या माणसालाही विकासाच्या प्रवाहात येता आले पाहिजे. यादृष्टीने शासनाने अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. यातील आरोग्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अत्यंत महत्वाच्या आहेत. यासाठी प्रत्येकाजवळ कार्ड असणे आवश्यक असून ते प्रत्येकाला मिळावे यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

‘मेरी माटी मेरा देश’ व जागतिक आदिवासी दिनानिमित्त तेलंगणाच्या काठावर असलेल्या मांडवी येथे आयोजित प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड वाटप शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस, मांडवीच्या सरपंच श्रीमती सुमनबाई पेंदोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने गावपातळीवर आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक गोरगरीब लाभार्थ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर त्यांना मोफत उपचार घेता यावेत यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हाती घेतली. महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. 5 लाख रुपयांपर्यतचे उपचार आता या योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहेत. यासाठी गावपातळीवर जनजागृतीची मोठी चळवळ निर्माण झाली पाहिजे असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. यादृष्टीने जिल्हा परिषदने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मांडवी सारख्या अतिदुर्गम आदिवासी गावात आयुष्यमान कार्ड वितरणासाठी भव्य प्रमाणात उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतूक केले.

 

लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी प्रत्येक नागरिकाची सकारात्मक भूमिका आवश्यक असते. यासाठी मतदान प्रक्रियेतील प्रत्येक नागरिकांचा सहभाग हा प्रत्येकाच्या कर्तव्याचा भाग आहे. आपली कर्तव्य ओळखून त्यांच्या पालनासाठी परस्परात सौहार्दता निर्माण करण्यासाठी अधिक सजग राहीले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर आता अमृतकाळ सुरु झालेला आहे. हा अमृतकाळ प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याचा, जागरुकतेचा आहे हे आपण विसरता कामा नये. या अमृत काळात प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची हमी मिळावी त्यांना उपलब्ध असलेल्या महत्वपूर्ण आरोग्याच्या योजनाचा लाभ घेता यावा यादृष्टीने मांडवी येथे आदिवासीसाठी हा विशेष कॅम्प घेतल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले. सर्व सामान्यांच्या आरोग्य उपचारासाठी ही चांगली योजना आहे. या योजनेबाबत नागरिकांनी अधिक माहिती घेवून ही योजना समजून घेतली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या शिबिरात 200 व्यक्तींना जन आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी यावेळी शिबिरात सेवा केंद्रातील विशेष टिम ठेवण्यात आली होती. यावेळी आदिवासी समाजातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

 

किनवट तालुक्यातील दिग्रस येथे ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत शिला फलकाचे अनावरण

किनवट तालुक्यातील दिग्रस येथे ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमातर्गंत ग्रामपंचायतीतर्फे उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, सरपंच श्रवण मिरासे, उपसरपंच नर्मदाबाई साबळे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पंचप्राण शपथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *