नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यात नांदेड येथील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला यश आले असून ही 22 वर्षीय बालिका सुखरुप आईच्या स्वाधीन करून पोलीसांनी सामाजिक दृष्टीकोणातून त्या कुटूंबाची शाब्बासकी मिळवली आहे.
अल्पवयीन बालक, बालिका गायब झाल्या तर त्या संदर्भाने भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल होत असतो. जानेवारी 2022 मध्ये पोलीस ठाणे उमरीच्या हद्दीत राहणारी एक 13 वर्षीय बालिका बेपत्ता झाली होती. उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 3/2022 दाखल झाला होता. दीड वर्षापासून बेपत्ता बालिका भेटत नव्हती म्हणून त्या प्रकरणाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करतांना एका 22 वर्षीय मुलाने या बालिकेला पळवून नेल्याची माहिती पोलीसांनी मिळवली आणि बालिकेचा आणि त्या युवकाचा फोटो प्राप्त करून तपास सुरू केला. युवकाच्या फोटोमध्ये त्याच्या गळ्यात असणाऱ्या आयकार्डवर आर हे इंग्रजी अक्षर पाहुन पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव यांनी पुणे जिल्ह्यातील आर. नावापासून सुरू होणारे प्रत्येक हॉस्पीटल तपासले. मग तेथून त्या युवकाचा नवीन नंबर प्राप्त झाला. या प्रकरणातील आरोपी मुलांनी चार महिन्यापुर्वी वापरलेल्या मोबाईल बाबतची तांत्रिक माहिती मिळवून मुळशी जि.पुणे येथून तपासाची सुरूवात केली. तांत्रिक माहितीनुसार मिळालेल्या इतर फोन क्रमांकावर प्रत्येकाला बोलत बोलत एक-एक कडी जोडून पोलीसांनी पोलीस ठाणे हिंजोडी जि.पुणे येथून दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन बालिकेला आणि त्या मुलाला ताब्यात घेतले.मुलीच्या कुटूंबाने पोलीसांना धन्यवाद दिले आहे. आरोपीला पकडल्यानंतर उमरी पोलीस ठाण्यात 363 च्या गुन्ह्यात पोक्सो कायदा जोडण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोेरे, एस.बी.बिरमवार, राजू सिटीकर, दिपक ओढणे यांनी ही कार्यवाही केली.प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उत्कृष्ट डिटेक्शन या सदरासाठी या पथकाचा अहवाल पाठविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या बालिकेला नांदेड पोलीसांनी शोधून तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले