नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलगी आपल्या मनाविरुध्द लग्न करत आहे म्हणून वडीलांनीच तिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी मारेकरी पित्याला गजाआड केले आहे.
पंचफुलाबाई अण्णाराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.2 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी मौजे मनु तांडा ता.मुखेड येथे त्यांचे पती अण्णाराव गोविंद राठोड (45) यांनी आपली मुलगी सामका उर्फ पापडी (16) वर्ष हिचा खून केला. पंचफुलाबाईच्या तक्रारीप्रमाणे त्यांची मुलगी सामका हिला खुशाल चव्हाण रा.राजूरा तांडा याच्यासोबत लग्न करू नकोस असे तिचे वडील अण्णाराव राठोड म्हणत होते. पण मुलगी ऐकत नव्हती म्हणून त्यांनी तिला घरात नेऊन तिच्यावर उसाच्या कोयत्याने हल्ला केला. तिच्या मानेवर व हातावर मार करून तिला मारुन टाकले. तिचे प्रेत जाळून टाकले. कोयता कुठे तरी फेकून देऊन घरातील रक्ताचे डाग पाण्याने पुसून रक्त लागलेले कपडे जाळून टाकून पुरावा नष्ट केला. घटनेची माहिती कोणास सांगिेतली तर मला पण खतम करतो अशी धमकी दिली. या तक्रारीप्रमाणे मुक्रामाबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201, 506 नुसार गुन्हा क्रमांक 165/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके अधिक तपास करीत आहेत.
लग्नाबद्दल मुलगी ऐकत नाही म्हणून बापाने केला अल्पवयीन मुलीचा खून करून पुरावा नष्ट केला