
पोलीस शिवराज विश्र्वंभर टरके
नांदेड(प्रतिनिधी)-अदखल पात्र गुन्ह्यात अटक करता येत नसतांना सुध्दा अटकेची भिती दाखवून जामीन देण्यासाठी मदत करतो असे आमीष दाखवून पोलीस अंमलदाराने पोलीस पाटलाच्यावतीने घेतलेली 5 हजारांची लाच आज सिध्द झाली आणि भोकरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय.एम.एच.खरादी यांनी पोलीस अंमलदार आणि पोलीस पाटील या दोघांना एक वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील पोलीस अंमलदार सध्या पोलीस अधिक्षक कार्यालयातील विशेष शाखेत कार्यरत आहेत.
मौजे लगळुद ता.भोकर येथील शेतकरी दिगंबर गणपतराव बागडे यांच्यासोबत तत्कालीन पोलीस अंमलदार आणि सध्या जिल्हा विशेष शाखेत कार्यरत शिवराज विश्र्वंभर टरके यांच्यासोबत 5 हजार रुपयांची मागणी 29 जुलै 2016 रोजी दुपारी 4 वाजता झाली. दिगंबर गणपतराव बागडेविरुध्द पोलीस ठाणे भोकर येथे एक अदखल पात्र गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक करून लॉकऍपमध्ये टाकण्याची भिती दाखवून आणि जामीन करून देण्याच्या कामासाठी ही 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तडजोडी अंती झालेली हेाती. लगळूद येथील पोलीस पाटील संजय उमकांत राजुरे यांनी ही 5 हजार रुपयांची लाच स्विकारली आणि टरकेला दिली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे दयानंद मुरलीधर सरवदे यांनी पोलीस नाईक शिवराज विश्र्वांभर टरके आणि पोलीस पाटील संजय उमाकांत राजूरे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयात या प्रकरणी चार साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुरावा आणि युक्तीवाद याच्या आधारावर न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी यांनी शिवराज टरके आणि संजय राजूरे यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 आणि 12 प्रमाणे दोषी जाहीर केले आणि त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकास दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. सौ.शैलजा अनिल पाटील यांनी काम केले आणि पैरवी अधिकारी म्हणून प्रदीप कंधारे, बालाजी तेलंग यांनी जबाबदारी पुर्ण केली.