ऑफिसर्स क्लब सार्वजनिक; रुबाब मात्र मूठभर स्वार्थी धनदांडग्यांच्या !
लातूर( जावेद शेख) -सध्या लातुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांची झेलण्याची जणू कांही स्पर्धाच लागली आहे.परिणामी आय.ए.एस असेल किंवा आय.पी एस त्याने अक्षरशः डाके जरी घातले तर त्याचे ठरवून उदात्तीकरण करणे मागील कांही काळात सुरू असल्याने फिरून फिरून वाटेल ती किंमत मोजून व्हाया राजकीय व प्रशासकीय दलाल अधिकारी लातूरला येत असतात.कारण चोऱ्या आणि डाके घालण्यासाठी लातूरसारखे सुरक्षित ठिकाण नाही अशी एक मानसिकता येथील कांही प्रवाहात व प्रक्रियेत असणाऱ्या लाळघोट्या मंडळींमुळे तयार झाली आहे.परीणामी हम करे सो कायदा या मानसिकतेतुन मागील कांही काळात लातुरात आय.ए.एस आणि आय.पी एस अधिकाऱ्यांनी अक्षरशः नंगानाच आणि थैमान माजवले आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी काय केले आहे माहिती नसताना किंवा काय करणार हे स्पष्ट नसताना अधिकारी लातुरात आला की त्याचा स्वागत समारोह,सत्कार करण्याची एक नवीन पद्धत आता सुरू झाली आहे.एखाद्या वेळी बरेच दिवस लातुरात सेवा केल्यानंतर निरोप समारंभ साहजिक आहे.मात्र जुम्मा को जुम्मा आठ दिवस लातुरात येऊन नूतन जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांना झाले असताना,कोणतेही जनतेच्या हिताचे काम केलेले नसताना सार्वजनिक मात्र ठराविक धनदांडग्यांनी कब्जा केलेले ऑफिसर्स क्लबच्या वतीने स्वागत समारोह करण्यात आला.कोणाचे स्वागत कोण करावे हा ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे,त्याने घरी घेऊन जाऊन केला तर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही.मात्र सार्वजनिक अर्थात जनतेची व शासकीय मालमत्ता असलेल्या ऑफिसर्स क्लबमध्ये ज्यावेळी स्वागत समारोह होतो, ज्या क्लबच्या बहुतांश सदस्यांची काळी प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी येऊ शकतात किंवा यापूर्वीच आलेली आहेत, त्यावर पांघरून घालण्यासाठी स्वागत समारोहाच्या नावाखाली दबावतंत्र, आमची पोहच कुठपर्यंत आहे,किंवा आमच्या मार्फत भ्रष्टाचार केला तर सुरक्षित राहील,कोठेही चर्चा होणार नाही हा निरोप देण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जातोय का हा मूळ संशोधनाचा विषय आहे.नूतन जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांनी ऑफिसर्स क्लबचे जे सदस्य आहेत,त्यांचे व्यवसाय, धंदे काय आहेत,व ते सदस्य कसे झाले आहेत व सार्वजनिक व शासकीय मालमत्ता असताना ठराविक धनदांडग्यांची मक्तेदारी कशासाठी याचा शोध घेतला तर धक्का बसेल अशी परिस्थिती आहे.अर्थात ती घेण्याची व पारदर्शक कारभार करण्याची इच्छा असेल तर अन्यथा या मंडळीत विश्वासू सोर्स शोधणे सुरू असेल तर महेश शुक्ला,एस.एस हुसैन,प्रवीण परदेशी यांनी जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या जनतेच्या सेवेसारखे अपेक्षित कार्य होणारच नाही.आणि त्यामुळे या मंडळीमुळे चुकीच्या जिल्हाधिकारी यांच्या यादीत वर्षा घुगे यांचे नाव आले तर नवल वाटायला नको.
8 ऑगस्ट रोजी लातूरच्या नवीन जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांचा स्वागत समारोह ऑफिसर्स क्लबमध्ये करण्यात आला.अर्थात त्यामागे घुगे यांचे काय कर्तृत्व होते किंवा आहे हा भाग संशोधनाचा आहेच.खरं तर कोणताही अधिकारी कर्तृत्व जरी गाजवला तरी तो त्याची ड्युटी करत असतो.मात्र आज काल लातुरात कांही राजकीय व प्रशासकीय दलालांनी अधिकारी लातुरात आला की त्याच्या आजूबाजूला राहून चोऱ्या,डाके कसे घालायचे व ते आम्ही कसे लपवतो,किंबहुना गिऱ्हाईक देखील आम्हीच आणतो,तुम्ही फक्त नियमात बसवून काम करून दयायचे अशी एक प्रक्रिया करून ठेवली आहे.ज्यातून आपले काळे कर्तृत्व देखील पांढरे करून घेतले जाते,किंवा लपवले जाते.त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी आला की त्याला व्यवस्थित पट्ट्यात घेतले जाते.अगदी बघा ना नूतन जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांचा स्वागत समारोह 8 ऑगस्ट रोजी सांयकाळी 6 वाजता होता, जिल्हाधिकारी 8.30 ला आल्या,तोपर्यंत लातूरचे धनदांडगे अर्थात ऑफिसर्स क्लबचे सदस्य ताटकळत उभे होते.मरता क्या नही करता अशीच अवस्था ती होती.लातूरला आय.ए.एस किंवा आय.पी.एस अधिकारी आणताना विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख अगदी अमित देशमुख सुद्धा वाजवून,पडताळणी करून,माहिती घेऊन आणायचे.म्हणजे खोटा सिक्का असेल तर त्याची दखल सुद्धा ते घेत नसत.लातूरला येण्यासाठी तो अधिकारी भेटण्यासाठी इच्छुक असेल तर त्याला भेटत सुद्धा नसतं हे वास्तव आहे.मात्र आज अगदी हवालदार ते जिल्हाधिकारी आणायचे सूत्र अल्पावधीत सत्तेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्याकडे आल्यामुळे त्याला देखील पैसा महत्त्वाचा वाटत आहे,जनता गेली चुलीत अशीच अवस्था आहे.परिणामी चुकीचे आय.ए.एस आणि आय.पी.एस अधिकारी लातूरला मागच्या काळात आले.म्हणजे काँग्रेस सोडून जेवढा काळ इतरांची सत्ता राहिली अर्थात भाजपची सत्ता राहिली तो काळ व त्या काळातील अधिकारी पाहिले तर आपोआप चित्र स्पष्ट होईल.त्यातच शहरात झालेले ऑफिसर्स क्लब व त्याचे सदस्य आणि ते सदस्य कसे झाले हा तर फार रंजक इतिहास आहे.ऑफिसर्स क्लब ही शासकीय व सार्वजनिक मालमत्ता आहे.ज्याची जागा शासनाची आहे तसेच या इमारतीवर मोठा निधी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून म्हणजेच जनतेच्या खिशातून गेला आहे.आणि सार्वजनिक व शासकीय मालमत्ता असल्याने महानगरपालिकेने या इमारतीचा बांधकाम परवाना देताना कोणतेही शुल्क घेतले नाही.असे असताना या क्लबचा वापर हा ठराविक धनदांडगे यांच्या हातात गेला आहे.जे या क्लबच्या माध्यमातून दबावतंत्र तयार करत आहेत अशी अवस्था आहे.व त्याचाच एक भाग म्हणून 8 ऑगस्ट रोजी सांयकाळी 6 वाजता लातूरच्या नवीन जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांचा स्वागत समारोह ठेवला गेला.मात्र हा समारोह नेमका कशासाठी होता हा मूळ संशोधनाचा विषय आहे.नूतन जिल्हाधिकारी यांचे असे काय कर्तृत्व या ऑफिसर्स क्लबच्या सदस्यांना दिसले की त्यांचा सत्कार त्यांना करावासा वाटला.की मग आगामी काळात आपले प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे आले तर आपल्यावर कृपादृष्टी राहावी म्हणून व कांहीनी जिल्हाधिकारी यांच्या जवळ जाण्यासाठी व त्यातून कांही कामे करून घेता यावी म्हणून हा सर्व खटाटोप केला गेला आहे असे सरळ आणि स्पष्ट दिसत आहे.ऑफिसर्स क्लबचे सदस्य जर पाहिले तर बिल्डर,डॉक्टर,अधिकारी,खाजगी कोचिंग क्लासेसवाले मंडळी आहेत.अर्थात ज्यावेळी हे लोक सदस्य झाले त्यावेळी कसे झाले हा इतिहास ऐकला तर धक्का बसेल असाच आहे.म्हणजे बंदुकीचा परवाना नूतनीकरण असेल तर व्हा सदस्य,वाइन शॉप,बार,दारू दुकान याचे काम असेल तर व्हा सदस्य, कोणाचे अनधिकृत बांधकाम आहे,किंवा अन्य प्रकरण आहे जे जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे,त्याला अभय हवे असेल तर व्हा सदस्य असे अनेक प्रकार आज देखील लातुरात ऐकावयास मिळत असतात.अर्थात खड्डे खंदून किंवा शेत विकून कोणीही सदस्य झालेला नाही.आपापाचा माल गपापाला अशीच ती अवस्था आहे.त्यामुळे शहरातील डॉक्टर, खाजगी कोचिंग शिक्षक, बिल्डर, बांधकाम व्यावसायिक, प्लॉटिंग करणारे,कांही वकील हे या ऑफिसर्स क्लबचे सदस्य आहेत.ज्यांची अनेक प्रकरण सध्या प्रलंबित आहेत.कांहीचे प्रकरण उच्च न्यायालयात तर कांहीचे प्रकरण मनपा आयुक्त तर कांहीचे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत.यातील बहुतांश बिल्डरचे बोगस एन.ए आहेत,कांहीनी शासकीय जमिनीवर ताबा घेतलेला आहे,अनेकांचे अनधिकृत बांधकाम आहेत असे बरेच प्रकार आहेत.ज्याचा थेट संबंध जिल्हाधिकारी यांच्याशी येतो.मग आपल्यावर कारवाई होऊ नये किंबहुना आपल्या माध्यमातून आणखीन चार काळी कामे करून घेता यावीत म्हणून तर हा स्वागत समारोहचा खटाटोप केला गेला नाही ना असा संशय शहरात व्यक्त केला जातो आहे.अर्थात त्यामागे या सदस्य असलेल्या मंडळींची नसलेली विश्वासहर्ता आहे हे वेगळे सांगायला नको.त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी जनतेच्या हितासाठी काम करणार की या मुठभर धनदांडग्यांसाठी हा मूळ प्रश्न आहे.वर्षा घुगे यांचा नांदेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेला कारभार आणि लातुरात येताच कांही ठराविक मंडळी सोबत असलेला वावर पाहता दोन वर्षांपूर्वीचा कार्यकाळ परत येतो की काय असे वाटू लागले आहे.लातूरला जिल्हाधिकारी यांची मोठी व उज्ज्वल परंपरा आहे.एस.एस हुसैन,महेश शुक्ला, प्रवीण परदेशी ,एकनाथ डवले यांचे नाव आज देखील घेतले जाते.महेश शुक्ला यांची दारे तर जनतेसाठी चोवीस तास खुली असायची.मात्र त्यानंतर जनतेला आतून आपला वाटावा असा जिल्हाधिकारी झालाच नाही.आता लातूरला पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून वर्षा घुगे या आल्या आहेत.त्या कसे काम करणार हे आगामी काळात कळेलच. मात्र आपले नाव कोणत्या जिल्हाधिकारी यांच्या यादीत म्हणजे बदनाम जिल्हाधिकाऱ्याच्या का कर्तृत्ववान जिल्हाधिकाऱ्यांच्या हे त्यांना ठरवायचे आहे.अर्थात लातूरला आल्यापासून ज्या मंडळीत त्यांचा वावर दिसतोय तो पाहता कांही वेगळे,जनतेच्या हिताचे घडेल असे आज तरी दिसत नाहीये.ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आता फर्स्ट इम्प्रेशनच जर प्रभावी पडले नसेल अर्थात ते बघण्याची दृष्टी असेल तर,बाकी राजकीय व प्रशंसाकीय दलालांना तर सर्व हिरवे हिरवेच दिसणार.मात्र कोणाचे तरी आपण देणे लागतो व तो कोण तरी आपल्या बाबतीत काय विचार करतोय किंवा त्याची दृष्टी काय याचा विचार जिल्हाधिकारी यांनी करणे गरजेचे आहे.