नांदेड (जिमाका)- डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या संस्थेतील शरीरविक्रतीशास्त्र विभागामध्ये डेका हेड मायक्रोस्कोप यशस्वीरित्या बसवण्यात आले आहे. डेका हेड मायक्रोस्कोप हे कमी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहे. डेका हेड मायक्रोस्कोप हा नावाप्रमाणेच सूक्ष्मदर्शकाला दहा डोके आहेत. यात मध्यवर्ती एक डोके आणि स्लाइडसाठी स्टेज, 5 मॅग्निफिकेशन लेन्स, त्याच्या शरीरासह स्थूल आणि बारीक समायोजने असतात. इतर 9 डोके निरीक्षणासाठी आहेत. त्यामुळे एका तज्ञासह आणखी 9 लोक एकाच वेळी समान स्लाइड पाहू शकतात.
स्लाइडमध्ये विभाग सुलभपणे निर्देशित करण्यासाठी लेसर पॉइंटर दिलेला आहे. डेका हेड मायक्रोस्कोपीचा वापर प्रामुख्याने शिकवण्यासाठी आणि प्रात्यक्षिकासाठी केला जातो. हे एकाच वेळी अनेक तज्ञांद्वारे जैविक विश्लेषणासाठी वापरले जाऊ शकतात.
एक-एक करून अहवाल देण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होते आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचे उद्दिष्टही एकाच वेळी साध्य करता येते. तसेच विद्यार्थ्यांची सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्याची दृष्टी विकसित होण्यास मदत होते.
अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, उप अधिष्ठाता डॉ एच.व्ही. गोडबोले, प्राध्यापक डॉ. एम.ए.समीर, शरीरविक्रतीशास्त्र डॉ. विशाल मुधोळकर, डॉ. दिपक साधून व इतर अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.