6 हजारांची लाच मागणारा तलाठी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-20 जून रोजी दाखल झालेल्या लाच मागणी प्रकरणातील फरार तलाठी अखेर 10 ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला. 11 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत विशेष न्यायाधीश एस.वी. इंदापूरकर यांनी 6 हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.9 जून 2023 रोजी सज्जा शिवपुरी/तामसा येथील तलाठी रुपेश देविदास जाधव यांनी तक्रारदाराकडून त्याच्या पत्नीला माहेरकडून मिळालेल्या जमीनीचा फेरफार नोंद करून 7/12 वर नाव लावण्यासाठी 7 हजारांची लाच मागितली. त्यानंतर त्यात तडजोड झाली आणि लाचेची रक्कम फोन पेद्वारे घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून 20 जून 2023 रोजी तलाठी रुपेश देविदास जाधव विरुध्द तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारच होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आणि अंमलदार त्याचा शोध घेत होते. 11 ऑगस्ट रोजी तलाठी जाधव हदगाव हद्दीतील जवळगाव येथे लपून बसल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक प्रिती जाधव, अंमलदार संतोष वच्छेवार, बालाजी मेकाले आणि निलकंठ येमुलवार यांनी जवळगाव येथून पळून जातांना तलाठी रुपेश जाधवला हदगाव पेट्रोलपंपावर पकडले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वी. इंदापूरकर  यांनी पकडलेल्या तलाठी रुपेश देविदास जाधवला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *