नांदेड (जिमाका)- विकासाच्या संकल्पनेत सर्वाचा विकास यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील सर्वच घटकांचे प्रतिबिंब हे शासकीय योजनांसह मतदान प्रक्रियेच्या, मतदानाच्या हक्कापर्यत अभिप्रेत आहे. रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना मतदानाच्या हक्कासह विविध शासकीय योजनाही प्रभावी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे, प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. धनेगाव येथील पाल टाकून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या वसतीवर भेट देवून त्यांनी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगिता चव्हाण, तहसीलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, धनेगावचे सरपंच गंगाधर शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनात काम करणारे अधिकारी हे तुमच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. ते आपले आहेत आपल्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजना तुमच्या सकारात्मक सहभागाशिवाय साकार होवू शकणार नाही. ज्या योजना आहेत त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लाभ घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले. यावेळी 71 व्यक्तींना मतदान फार्म भरुन घेतले, 107 व्यक्तींना जात प्रमाणपत्र, 10 व्यक्तींना रेशन कार्ड, 40 व्यक्तींची आधार नावनोंदणी, 8 व्यक्तींना संजय गांधी फॉर्म, 7 व्यक्तींना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 7 व्यक्तींना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्तांतील गारुडी, कुडमुडे जोशी आदींनी आपल्या पारंपारिक पोषाखात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व मान्यवरांचे स्वागत केले.