नांदेड(प्रतिनिधी)-अनैतिक संबंध असणाऱ्या एका 41 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार बरडशेवाळा ता.हदगाव येथील स्मशानभुमीजवळ 15 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजता घडला आहे. या प्रकरणातील दोन जणांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
चंद्रमणी अरविंद नरवाडे (23) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील अरविंद देवराव नरवाडे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून 15 ऑगस्टच्या रात्री 10.30 वाजता बरशेवाळ स्मशानभुमीजवळील गायरानातील पाऊल वाटेवर संजय महादु वावळे(50) रा.शेवाळपिंपरी ता.हदगाव सध्या बरडशेवाळा, सुभाष तुकाराम जमदाडे(41) रा.बरडशेवाळा आणि मिलिंद विजय कदम(30) रा.बरडशेवाळा या तिघांनी मिळून लाकडी दांड्याने आणि लाकडी फळीने माझे वडील अरविंद देवराव नरवाडे यांच्या डोक्यावर, पायावर, जोरजोरात मारहाण करून त्यांचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, सहाय्यक पोलीस अधिक्षक शफकत आमना यांनी घटनास्थळी भेट दिली. घडलेला प्रकार तपासून आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. मनाठा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार गुन्हा क्रमांक 94/2023 दाखल केला आहे. या घटनेचा तपास मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
संतोष शेकडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी या खून प्रकरणातील संजय महादु वावळे (50) आणि सुभाष तुकाराम जमदाडे (41) या दोघांना पकडले. आज हदगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पकडलेल्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीचा खून