पाच वर्ष सक्तमजुरी आणि सात जणांना एकूण 1 लाख 63 हजार रुपये दंड
नांदेड(प्रतिनिधी)-शेताच्या वादातून अनुसूचित जातीच्या कुटूंबावर शेतात आणि घरात घुसून त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सात जणांना विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी कठोर शिक्षेसह सर्वांना मिळून 1 लाख 63 हजार रुपये दंड रोख दंड ठोठावला आहे. दंडातील रक्कमेपैकी 5 जखमी लोकांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
दि.8 जानेवारी 2018 रोजी मौजे काकांडी येथील शेत गट क्रमांक 66, शेत सर्व्हे नंबर 49 मध्ये मगरे कुटूंबातील महिला तुरी कुटत असतांना हे शेत आमचे आहे असे सांगत तुम्ही तुरी का कुटता म्हणून आनंदा कोंडीबा पवार (63), प्रसाद उर्फ परशुराम आनंदा पवार (25), विजयकुमार आनंदा भालेराव(21), सुनिल आनंदा भालेराव(19), ललिताबाई आनंदा भालेराव (55), नागनाथ आनंदा पवार(30) आणि बंडू उर्फ नागोराव आनंदा भालेराव (29) यातील भालेराव कुटूंबिय भायेगावचे राहणारे आहेत आणि इतर कांकाडीचे राहणारे आहेत. हा प्रकार 8 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता घडला. हल्ला करणाऱ्या लोकांनी मगरे कुटूंबियांवर शेतात आणि घरात घुसून हल्ला केला. ज्यामध्ये चंद्रकांत किशन मगरे, रामा किशन मगरे, लक्ष्मीबाई रामा मगरे, काशिनाथ किशन मगरे आणि ज्ञानेश्र्वर किशन मगरे असे 5 जण जखमी झाले. ज्यामध्ये काही जणांचे डोके फुटले, काहींच्या पायावर मार लागला. एकूण हा जिवघेणा हल्ला होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 324, 452, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(आर)(एस), 4(जे)(एस) प्रमाणे गुन्हा क्रमांक 20/2018 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस उपअधिक्षक तथा प्रभारी इतवारा उपविभाग डी.टी.टेळे आणि पोलीस उपनिरिक्षक आर.एस.जाधव यांनी केला. या प्रकरणात तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यावर स्पेशल ऍॅट्रॉसिटी केस क्रमांक 9/2018 या प्रमाणे या खटल्याची सुनावणी झाली.
या खटल्यात एकूण 13 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. त्यात आयपीएस अधिकारी जी.विजयकृष्ण यादव व्यंकटेश्वरलू याचीही साक्ष झाली. विजयकृष्ण यादव यांच्यावर लाच प्रकरणाचा आरोप सुध्दा लागला होता. प्रकरणातील एकूण उपलब्ध पुरावा ग्राहय मानत न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या तिन जणांना वगळून चार जणांना ऍट्रॉसिटीसह आणि सातही जणांना आयपीएस प्रमाणे वेगवेगळ्या शिक्षा दिल्या.
दिलेल्या शिक्षेतील आरोपी तीन जणांना ऍट्रॉसिटी कायदाप्रमाणे तीन वर्ष सक्तमजुरी 10 हजार रुपये रोख दंड. 307 प्रमाणे सात जणांना पाच वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 10 हजार रुपये रोख दंड. कलम 149, 506 आणि 148 प्रमाणे प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी आणि दोन्ही कलमांसाठी 1-1 हजार रुपये रोख दंड. कलम 324, 323 आणि 452 साठी प्रत्येकी दोन वर्ष शिक्षा आणि प्रत्येकास 2 हजार रुपये रोख दंड ठोठावला.या प्रमाणे या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत म्हणजे या प्रकरणातील शिक्षा पाच वर्ष सक्तमजुरी आणि एकूण 1 लाख 63 हजार रुपये रोख दंड अशी आहे.
दंडाची रक्कम वसुल झाल्यानंतर या प्रकरणातील जखमी चंद्रकांत मगरे, रामा मगरे, लक्ष्मीबाई मगरे, काशीनाथ मगरे आणि ज्ञानेश्र्वर मगरे या पाच जणांना प्रत्येकी 10 हजार रुपये द्यावेत असे निकालात नमुद केले आहे. या प्रकरणात सामाजिक विभागाने काही आर्थिक मदत दिली असेल तर ती रक्कम या दंडाच्या रक्कमेतून ऍडजेस्ट करावी असे निकाल लिहिले आहे. तसेच या निकालाची प्रत जिल्हा न्यायदंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. ज्यामुळे या प्रकरणातील पिडीतांना काय मदत देता येईल हे पाहिले जाते. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.रणजित देशमुख यांनी काम केले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार फय्याज सिद्दीकी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.
शेताच्या वादातून जिवघेणा हल्ला करणाऱ्या सात जणांना जबर शिक्षा