भोकर(प्रतिनिधी)-शहरातील व ग्रामीण भागातील गरजुंना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने शहरामध्ये समर्थ अर्बन को.ऑप.सोसायटी लि.चा शेअर्स विक्री शुभारंभ आज दि.21 रोज सोमवारी सकाळी 11 वाजता येथील दत्तगडावर महंत उत्तमबन महाराज यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्यप्रवर्तक माजी जि.प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी दिली आहे.
भोकर तालुक्यातील सर्व सामान्य नागरीकांना आर्थिक पाठबळ सहज मिळण्यासाठी समर्थ अर्बन सोसायटी निर्माण करण्यात आली आहे. या सोसायटीचे कार्यालय बाजार समिती परिसरातील गाळा क्रमांक 3 मध्ये या संस्थेच्या शेअर्स विक्रीचा शुभारंभ सोमवारी सुरू केला जाणार आहे. या संस्थेचा 2 हजार नोंदणीचा संकल्प असुन एक महिन्यात सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये 500 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत प्रति शेअरविक्री केली जाणार आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी, मध्यवर्ग, युवावर्ग, कष्टकरी यासह प्रत्येक क्षेत्रातील गरजूंना हे शेअर्स विक्री करता येणार आहेत. येणाऱ्या काळात नव तरुणांना, उद्योजकांना व शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या संस्थेला पाठबळ मिळण्यासाठी जास्तीत जास्त सभासद होवून योगदान द्यावे व या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जि.प.चे माजी सभापती तथा मुख्य प्रवर्तक बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे.