नांदेड(प्रतिनिधी)-बोंढार गावात अक्षय श्रावण भालेराव या युवकचा खुन झाला. या प्रकरणात पोलीसांनी सात जणांविरुध्द न्यायालयात खून सोबत ऍट्रॉसिटी कायदा आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये दोषारोप पत्र दाखल केले आहे. परंतू बोंढार गावातील प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. आज झालेल्या एका बैठकीत पुन्हा एकदा गावातील समस्यांसह पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या निलंबनाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेक विभागांचे प्रमुख हजर होते. दिलेल्या निवेदनावर मी 15 दिवसांत निर्णय देईल असे वचन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहे.
दि.1 जून 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता बोंढार गावात लग्न करून आलेल्या एका नवराची मिरवणूक डी.जे.वाजवून निघाली. त्यावेळी अक्षय श्रावण भालेराव त्यांचा भाऊ आकाश भालेराव यांच्यासह आकाशचे आई-वडील आणि बौध्द वस्तीवर जमावाने हल्ला केला. त्या हल्यात अक्षय भालेरावचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी आकाश भालेरावच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 392/2023 दाखल झाला. या गुन्ह्यात ऍट्रॉसिटी कायद्याची अनेक कलमे, सोबत बेकायदा जमावाची कलमे, खून, जिवघेणा हल्ला, मारहाण यासह भारतीय हत्यार कायद्याची कलमे जोडण्यात आली होती.
काही दिवस हा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांच्या तपासावर होता. दोन दिवसांतच हा गुन्हा पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेने सर्वाधिक आरोपी पकडले. त्यानंतर सुरज गुरव यांनी संतोष संजय तिडके (19), निळकंठ गणेश तिडके (21), नारायण विश्र्वनाथ तिडके (30), माधव गोविंद तिडके (35), कृष्णा गोविंद तिडके (22), दत्ता विश्र्वनाथ तिडके (22), शिवाजी यशवंत तिडके(34), बापुराव सोनाजी तिडके आणि बालाजी मुंगल अशा नऊ जणांविरुध्द न्यायालयात मुदतीत दोषारोप पत्र दाखल केले आहे.
बोंढार गावात तीन महिन्यापुर्वी झालेल्या खून प्रकरणाचे पडसाद आजही संपलेले नाहीत. या संदर्भाने प्रशासनाच्यावतीने आज एक बैठक बोलावण्यात आली होती. ती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी हजर होते. या बैठकीत अक्षय श्रावण भालेराव यांचा खून झाल्यानंतर तयार झालेली परिस्थिती त्यावर चर्चा झाली. त्यात गावकऱ्यांनी आपल्यावतीने बऱ्याच मागण्या उपस्थितीत केल्या. त्या सर्व विषयांवर वेगवेगळ्या विभागाच्यावतीने लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून देवू असे सांगण्यात आले.
या बैठकीत अक्षय भालेरावचे आई वडील आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पालमकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार तत्कालीन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक, सध्या वजिराबादचे पोलीस निरिक्षक आणि भविष्यात स्थानिक गुन्हा शाखेत जाण्याचे स्वप्न बाळगणारे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी अक्षय भालेराव यांच्या खून प्रकरणात अनेक पुरावे नष्ट केले, गुन्हा घडल्यानंतर त्यांनी आरोपी शोधण्याऐवजी आरोपींच्या नातलगांच्या घरी जाऊन भेटी दिल्या, अक्षय भालेरावची अंतिमक्रिया मी करत आहे असे दाखवतांना त्यात केलेली घाई काही तरी घोटाळा आहे असा त्या निवेदनाचा आशय आहे. या निवेदनानुसार अशोक घोरबांड यांना निलंबित करून चौकशी करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमुद आहे. यावर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 15 दिवसांच्या आत या निवेदनावर मी निर्णय देईल असे सांगितले, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
बोंढार गावातील सुविधांसह अशोक घोरबांड यांच्या निलंबनाच्या मागणीला पुन्हा वेग