वसमत(प्रतिनिधी)-फळ विक्री करणाऱ्या महिलांकडून खंडणी मागणाऱ्या एका युटूबर पत्रकाराविरुध्द वसमत पोलीसांनी एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल केले आहेत. फळ विक्रेत्या महिलेच्या तक्रारीवरुन ऍट्रॉसिटी कायदा पण जोडण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत येथील एका अनुसूचित जातीच्या महिलेने तक्रारीत लिहिल्यानुसार तु नालीच्या पाण्याने फळे धुत असलेला व्हिडीओ व्हायरल करतो असे सांगून तिच्याकडून 500 रुपयांची मागणी केली. तिला जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिचा पदओढून विनयभंग करून धक्काबुक्की केली. या तक्रारीनुसार वसमत शहर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354(ब), 385, 323, 504 सोबतच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारणा 2005 मधील कलम 3(1)(डब्ल्यू)(आय), 3 (2), (व्ही.ऐ.) नुसार गुन्हा क्रमांक 433/2023 युटूबर पत्रकार दिनेश कालीदास कुलकर्णी विरुध्द दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभाग वसमतचे पोलीस उपअधिक्षक शेळके यांच्याकडे देण्यात आला आहे.
याला जोडूनच पोलीस अंमलदार प्रभु बापूराव धुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 ऑगस्ट रोजी रात्री 9.41 वाजता युटूबर पत्रकार दिनेश कालीदास कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात मला लॉकऍपमध्ये टाकले तर तुमच्या पीआयला व तुम्हाला सगळ्यांना पाहुन घेतो, मी लॉकऍपमध्ये आत्महत्या करतो. तुमच्या सगळ्यांना टाकतो, तुम्हा सर्वांना पाहुन घेतो असे सांगून शासकीय कामात अडथळा केला. वसमत शहर पोलीसांनी धुर्वे यांच्या तक्रारीवरुन दिनेश कालीदास कुलकर्णीविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 186, 189 सोबत क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932 मधील कलम 7(1)(ए) प्रमाणे गुन्हा क्रमांक 434/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक हाकीम यांच्याकडे देण्यात आला आहे.
युटूबर पत्रकाराविरुध्द पोलीसांनी दाखल केले दोन गुन्हे