
नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील अनाधिकृत नळ जोडणी मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत नळ जोडणी असल्याचे आढळून आल्यानंतर 21 पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकांच्या माध्यमातून अनाधिकृत नळ जोडणीविरुध्द कार्यवाही करत त्यांना अधिकृत नळ जोडणी करून घेण्याकरीता सुचना दिल्या आहेत. पुढील आठ दिवसात अधिकृत नळ जोडणी करून घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रत्येक सहा क्षेत्रीय कार्यालयात अनधिकृत नळ जोडणी सर्वेक्षण, अनधिकृत नळ जोडणी खंडन करणे, त्यांच्या याद्या तयार करणे अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करण्यासाठी अनधिकृत नळ जोडणी धारकांना मार्गदर्शन करुन अधिकृत नळ जोडणीसाठी प्रेरित करणे, संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सर्वेक्षणासाठी आपआपले क्षेत्र निश्चित करून घ्यावे, पथकातील सर्व कर्मचारी यांनी आपसात सहकार्य ठेवुन आपल्याला दिलेल्या भागात नळ जोडणी सर्व्हे करावा. कामात कुचराई करु नये कामात कुचराई करणा-यांचा अहवाल मा. आयुक्त महोदयांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगुन, पथक प्रमुखांनी पथकाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाणी पुरवठा विभागास न चुकता दररोज सादर करावा तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालया मध्ये एक टीम ही वाणिज्य वापर करणा-या व्यवसायीकांची अनधिकृत नळ तपासणी करतील अशा सुचना अतिरिक्त आयुकातांनी बैठकीत दिल्या.
अनाधिकृत नळ जोडणी अधिकृत करुन घेण्यासाठी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दुस-या वेळेस दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयुक्त यांच्या आदेशाने 21 पथकाची स्थापना करण्यात आली असुन प्रत्येक पथकात पथकप्रमुख व अन्य तीन कर्मचारी यांचे आदेश पारित केले आहेत.
ज्या मालमत्ता धारकांनी यापुर्वी अधिकृत नळ जोडणी घेवुन पावत्या घेतल्या आहेत परंतु ज्या मालमत्ता धारकांना पीन क्रमाक मिळालेला नाही त्या मालमत्ता धारकांनी पाणीपुरवठा विभाग, पहिला मजला कक्ष क्र.114 येथे संपर्क साधुन आपल्या नळाचा पीन क्रमाक मिळवून घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.मुदत संपल्यानंतर ज्या मालमत्ता धारकांनी आपली नळ जोडणी अधिकृत करून घेतली नाही त्यांच्या विरोधात संबंधित पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करावेत अशा सुचना अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांना बैठकीत दिल्या.सदर बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता (पापु विभाग) संघरत्न सोनसळे क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरतुल्लाह बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, डॉ. रईसोद्दीन उपअभियंता प्रकाश कांबळे, पाणी पुरवठा विभागाचे सय्यद खदीर हुसैनी यांच्यासह पथकप्रमुख व पथकातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.
अनाधिकृत नळ धारकांनी पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधुन आपली नळ जोडणी अधिकृत करुन घ्यावी अन्यथा पोलीस स्थानकात पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांनी केले आहे.