नांदेड (जिमाका) – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व बस चालकांसाठी 20 जुलै 2023 पासून मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शासकीय रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नांदेड येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या कालावधीत करण्यात आले आहे. तरी सर्व बसचालकांनी या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
देशात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असून रस्ता सुरक्षितता ही परिवहन विभागाची महत्वाच्या जबाबदारी पैकी एक आहे. रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे आरोग्य तसेच वाहन चालकांच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचणी निर्माण होतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यात सर्व बस चालकांची आरोग्य व दृष्टी तपासणी 20 जुलै पासून करण्यात येत आहे. या तपासणी शिबिरात माहे जुलै महिन्यात एकूण 97 वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नेत्र तपासणी दरम्यान एकूण 52 वाहनचालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात 202 वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी दरम्यान एकूण 93 वाहनचालकांना परिवहन विभागाच्यावतीने मोफत चष्म्याचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या शिबिरात चष्मा लागलेल्या वाहन चालकास मोफत चष्मे वाटप करण्यात येत आहेत. तरी बस चालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.