नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये शिक्षकांच्या वेतन घोळासाठी सहा शिक्षकांनी आवाज उठवल्यानंतर आवाज उठवणाऱ्या शिक्षकांचे वेतन नागार्जुना पब्लिक प्रशासनाने अर्धे वेतन केले. जानेवारी 2023 पासून या शिक्षकांना सेवेपासून दुर ठेवले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याची 20 वर्ष शाळेला देणाऱ्या शिक्षकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या फिसवर आणि शिक्षकांच्या अर्ध्या वेतनावर राजशाहीप्रमाणे जगणारे नागार्जुना पब्लिक स्कुलचे व्यवस्थापक मात्र आजही वाताणुकूलीत कक्षाची हवा खात आहेत.
जानेवारी 2023 पासून नागार्जुना पब्लिक स्कुलने आपल्या शाळेतील सहा शिक्षकांना सेवेपासून दुर ठेवले. कारण त्यांनी शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनाबद्दल आवाज उठवला. या शाळेतील एक शिक्षीका सौ.निशा गुडमेवार यांनी आपल्या जीवनाची 20 वर्ष या शाळेच्या उन्नतीसाठी दिली आहेत. शाळा व्यवस्थापन सौ.गुडमेवार यांना देत असलेले वेतन त्यांच्या बॅंक खात्यात यायचे. त्यानंतर बॅंक खात्यातून अर्धी रक्कम काढून ती परत शाळा व्यवस्थापनाला द्यावी लागत होती. याबद्दल सौ.गुडमेवार यांच्यासह इतर सहा शिक्षकांनी या वेतन घोळाविषयी आवाज उठवला तेंव्हा मार्च 2021 पासून त्यांचे वेतन अर्धे करण्यात आले. मार्च 2021 पर्यंत सौ.गुडमेवार यांच्या खात्यात 50 हजार रुपये वेतन जमा व्हायचे पण त्यांना कोणतीही नोटीस न देता ते वेतन 25 ते 27 हजार रुपये करण्यात आले. एमईपीएस कायदा 1977 नुसार कोणत्याही शिक्षकाचे वेतन अचानक कमी करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाला नाही. सौ.गुडमेवार ह्या एका शिक्षीकेला गेल्या दोन वर्षात चार लाखांपेक्षा जास्त कमी रक्कम शाळा व्यवस्थापनाने कमी दिलेली आहे. शिक्षीका सौ.गुडमेवार यांचे पाल्य नागार्जुना पब्लिक स्कुलमध्येच शिकतात. त्या शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाप्रमाणे शाळेत शिक्षक असणाऱ्या व्यक्तींच्या पाल्यांना मोफत शिक्षण दिले जाते. अर्धे वेतन कमी देवून आता नागार्जुना पब्लिक स्कुल सौ.गुडमेवार यांच्या पाल्यांची फिस सुध्दा मागत आहे. यापेक्षा मोठे दुर्देव काय ?
प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग शाळांची तपासणी करते. सन 2021 पासून नागार्जुना पब्लिक स्कुलची तपासणी झालीच नाही काय ? असा प्रश्न पिडीत शिक्षक उचलत आहेत आणि तपासणी झाली असेल तर शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या वेतनामध्ये होणाऱ्या अनियमिततेबद्दल प्रश्न का विचारले नाहीत असा प्रश्न पडतो. शिक्षकांच्या अर्ध्या वेतनावर आणि विद्यार्थ्यांच्या भल्या मोठ्या फिसवर राजशाही थाटात जगणाऱ्या शाळा व्यवस्थापनाने आता सहा शिक्षकांना भाकरीचा तुकडा शोधण्यावर आणले आहे.
जानेवारी 2023 पासून सौ.गुडमेवार यांना सेवेतून दुर ठेवले आहे. या काळात कोणतेही वेतन दिलेले नाही. त्यामुळे सौ.गुडमेवारच नव्हे तर इतर पाच शिक्षकांवर सुध्दा आपल्यासाठी आणि आपल्या कुटूंबियांसाठी भाकरीचा कुटका शोधण्याची वेळ आली आहे.शाळा व्यवस्थापनाच्या विरुध्द आवाज उठवणाऱ्या या शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रशासनाकडे सुध्दा वेळ नाही. नुतन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करणवाल यांनी या संदर्भाची एक बैठक बोलावली होती. परंतू प्रशासकीय कामाच्या व्यस्ततेमुळे ती बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे फक्त तोंडी पिडीत शिक्षकांना सांगण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त सुध्दा नांदेडला आले होते तेंव्हा त्यांना सुध्दा शिक्षकांनी निवेदन दिले आहे. त्यांनी सुध्दा मी पाहतो असे गोलगोल उत्तर शिक्षकांना दिले आहे.दरवर्षी नवीन पिढी तयार करणाऱ्या नागार्जुना पब्लिक स्कुलमधील सहा पिडीत शिक्षकांबद्दल देव त्यांना मदत करो यापेक्षा जास्त काही करणे अशक्य आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/08/21/सीईओ-मीनल-करणवाल-घेणार-ना/