
बहाद्दरपुरा(ता.कंधार प्रतिनिधी)-बहाद्दरपुरा ता.कंधार येथील मानार धरणाच्या पुलावर एक ट्रक अर्धा पुलाबाहेर गेल्यामुळे या मार्गावरची वाहतुक खोळंबली आहे. नांदेड ते जांब ता.मुखेड जाणारा 98 टक्के रस्ता पुर्णपणे चकाचक झाला आहे. परंतू मानसपुरी ते बहाद्दरपुरा पुल पर्यंतचा रस्ता अपुर्णच राहिला आहे. या अपुर्णतेचे कारण काय? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. बहाद्दरपुरा गावातून जातांना गावातील एक ग्रंथालय रस्त्यावरच आहे. त्या ग्रंथालयाला वळण घेवून जावे लागते. हा अदभुत खेळ या रस्त्यावर आहे.
आज सकाळी नांदेडकडून जांबकडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.26 ए.पी.2713 हा बहाद्दरपुरा गावाजवळ असलेल्या मानार नदीवरच्या पुलावरून जात असतांना तो डावीकडे कलंडला आणि अर्धा ट्रक पुलावरचे लोखंडी रेलींग तोडून पाण्यावर लटकला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक खोळंबली. वृत्त लिहिपर्यंत सुध्दा हा ट्रक पुलावरून बाहेर काढण्यात आला नव्हता. हा प्रकार पुलाच्या आलीकडे आणि पलीकडे आणि पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे घडला असे स्थानिक नागरीक सांगतात.
नांदेड ते जांब हा रस्ता 72 किलो मिटरचा आहे. या 72 किलो मिटरमध्ये 98 टक्के रस्ता हा पुर्णपणे सिमेंटचा झालेला आहे. परंतू मानसपुरी ते बहाद्दरपुरा पुला हा जवळपास 5 ते 6 किलो मिटरचा रस्ता आजही पुर्णपणे खड्ड्यांनी भरलेला आहे. लातूर-बिदरकडे जाणारी बरीच वाहने या मार्गाने जातात. हा रस्ता दुरचा आहे. परंतू थोडासा सोडून बाकीचा चांगला आहे म्हणून वाहन चालक या रस्त्याला आपले प्राधान्य देतात. पण मानसपुरी ते बहाद्दरपुरा पुल आणि पुलानंतर जवळपास पाऊण किलो मिटर रस्ता हा खड्ड्यांनीच भरलेला आहे. रस्त्यात खड्डे नसून खड्यांमध्ये रस्ता आहे अशी या रस्त्यांची परिस्थिती आहे.
बहाद्दरपुरा गावातून जातांना तर एक ग्रंथालय, वाचनालय रस्त्याच्या मधोमध आहे. त्या ग्रंथालयाला वळसा घालूनच जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना जावे लागते. आज सकाळी हा ट्रक क्रमांक 2713 जात असतांना खड्ड्यामुळेच त्या वाहन चालकाचे नियंत्रण वाहनावरून कमी झाले आणि ट्रक मानार धरणाच्या पाण्यावर लटकलेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक खोळंबली आहे. छोटी-छोटी वाहने, दुचाकी गाड्या अत्यंत कुर्म गतीने या रस्त्यावरून जात आहेत. परंतू वृत्तलिहिपर्यंत तरी पुलावरून मानार धरणावर लटकलेला ट्रक अद्याप बाहेर काढण्यात आलेला नाही.
