सामाजिक संकेतस्थळांवर रुग्णांच्या नावाने भिक मागण्याच्या पध्दतीवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-व्हॉटसऍपवर आजारी लोकांची मदत करा असे आवाहन येत असते. नांदेड येथील एका 5 वर्षीय बालकाबाबत अशीच जाहिरात करून करोडो रुपये कमावणाऱ्या इम्पॅक्ट गुरु आणि क्राऊड फंडींग या कंपनीच्या मालकांसह संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मडकी ता.लोहा येथील शेतकरी गोविंद हरीराम मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इम्पॅक्ट गुरु आणि क्राऊड फंडींग या कंपनीचे मालक पियुष जैन आणि कंपनीच्या इतर संचालकांनी नांदेड येथील एका 5 वर्षीय बालकाचा व्हिडीओमध्ये वापर करून त्याच्या आईच्या मार्फतीने भिक मागण्यासाठी उत्तेजन दिले. त्या बालकाच्या व्यंगतेचे फोटो विविध सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल करून करोडो रुपयांची भिक जमा केली आहे.
या तक्ररीनुसार बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015)च्या कलम 74 आणि 76(1) तसेच मुंबईचा भिक मागण्याचा प्रतिबंध करण्याचा अधिनियम 1959 च्या कलम 11 नुसार सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2023 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती कोट्यावधी रुपयांमध्ये असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय हे करणार आहेत.
अशा पध्दतीचा हा पहिलाच गुन्हा नांदेडमध्ये दाखल झाला.खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इम्पॅक्ट गुरु आणि क्राऊड फंडींग या कंपनीनी नांदेडच्या बालकाच्या नावावर जवळपास 2 कोटी 50 लाख रुपये जमा केल्याची माहिती प्राप्त होत आहे. नांदेडच्या बालकाला दर महिन्याला 12 लाख रुपयांचे इंजेक्शन सुध्दा लागते. ते इंजेक्शन इम्पॅक्ट गुरु आणि क्राऊड फंडींग या कंपनी या कंपनीद्वारे पुरवले जाते. अशी माहिती प्राप्त झाली आहे. सर्वसामान्य माणसांच्या व्हाटसऍपवर असे अनेक संदेश येत असतात. त्या रुग्णाची परिस्थिती आणि गरज पाहुन लोक पैसे देतात. पण ते पैसे खऱ्या अर्थाने रुग्ण म्हणून ज्याची प्रसिध्दी केली जात आहे त्यालाच मिळतात की नाही हा मोठा प्रश्न हा गुन्हा दाखल झाल्याने उघडकीस येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *