नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्त झालेल्या तत्कालीन कृषी अधिकारी तथा कृषी मंडळाधिकारी याच्यासह त्याची पत्नी व मुलाविरुध्द नांदेड जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 69.57 टक्के एवढी अपसंपदा अर्थात 48 लाख 43 हजार 65 रुपये किंमतीची बेहिशोबी मालमत्ता जमवणाऱ्या या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे. हे सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी बरबडा येथे सन 2000 ते 2017 दरम्यान कार्यरत होते.
नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक अरविंदकुमार भिमराव हिंगोले यांनी ही तक्रार दिली आहे. सध्या सेवानिवृत्त असलेले मंडळ कृषी अधिकारी, तत्कालीन कृषी पर्यवेक्षक रा.लासूर रेल्वे स्टेशन ता.गंगापूर जि.औरंगाबाद दत्तात्रय पितांबर गिरी (59), त्यांची पत्नी छायाबाई दत्तात्रय गिरी (55) आणि मुलगा शशांक दत्तात्रय गिरी (32) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. कृषी पर्यवेक्षक या पदावर दत्तात्रय गिरी हे सन 2000 ते 2017 दरम्यान बरबडा ता.नायगाव येथे कार्यरत होते. नांदेडच्या लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांची उघड चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी संपादीत केलेल्या मालमत्ता कायदेशीर आहेत काय? याबाबत त्यांना अनेकदा वेळ देऊन माहिती मागविण्यात आली होती. पण दत्तात्रय गिरी आणि त्यांचे कुटूंब त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेबाबत कोणताही पुष्ठीदायक पुरावा सादर करू शकले नाहीत. तेंव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची खात्री झाली की दत्तात्रय गिरी त्यांची पत्नी छायाबाई आणि मुलगा शशांक यांनी दत्तात्रय गिरी यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 48 लाख 43 हजार 66 रुपये किंमतीची बेहिशोबी मालमत्ता संपादीत केली आहे. दत्तात्रय गिरी यांच्या कायदेशीर उत्पन्न स्त्रोताच्या तुलनेत त्यांच्याकडे असलेली मालमत्ता 79.57 टक्के अधिक आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक अरविंदकुमार हिंगोले यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 13 (1)(ई) सोबत 13(2) आणि भारतीय दंड संहितेतील कलम 109 नुसार गुन्हा क्रमांक 338/2023 दाखल करण्यात आला आहे. बेहिशोबी मालमत्ता जमवणारे सेवानिवृत्त लोकसेवक दत्तात्रय गिरी, त्यांच्या पत्नी छायाबाई आणि मुलगा शशांक या तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी ताब्यात घेतले आहे. आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरिक्षक संदीप थडवे हे करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा लोकसेवकांच्यावतीने खाजगी माणुस(एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासकीय फिस व्यतिरिक्त अन्य रक्कम अर्थात लाचेची मागणी केली असल्यास अशा नागरीकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधानू माहिती द्यावी. जेणे करून भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी मदत होईल. नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 यावर सुध्दा संपर्क साधता येईल.
आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 48 लाख 43 हजार रुपये अपसंपदा जमवणाऱ्या माजी लोकसेवकासह पत्नी आणि मुलाला अटक