नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात उस्माननगर, बिलोली, लोहा, अर्धापूर येथे चार घरफोड्या झाल्या आहेत. धर्माबाद शहरातून एक चार चाकी गाडी चोरीला गेली आहे. मौजे आष्टी ता.तामसा येथून एक ट्रॅक्टर चोरीला गेल आहे.
नामदेव मारोती कदम रा.मौजे सावळेश्र्वर नई अबादी दत्तमंदिरजवळ ता.कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेदरम्यान ते शेतीच्या कामासाठी शेतात गेले असतांना त्यांच्या घराच्या कम्पाऊंटमधून आत चढून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्यद्वार तोडले आणि घरातील लोखंडी कपाट फोडून लॉकरमध्ये ठेवलेले 69 हजार 636 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. या प्रकरणी उस्माननगर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गाडेकर या चोरीचा तपास करीत आहेत. उस्माननगर पोलीस ठाण्यात यापुर्वी काही वर्ष स्थानिक गुन्हा शाखेतून उस्माननगर येथे गेले सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम केले आहे. स्थानिक गुन्हा शाखेत सगळ्यांच्या नावासह त्यांचेही नाव बक्षीस पत्रात येत होते. पण त्यांच्या कालखंडात उस्माननगर भागात झालेल्या सात चोऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. सध्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांच्या मार्गदर्शनात तरी उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाीेणाऱ्या चोऱ्या उघडकीस येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
छोटी गल्ली बिलोली येथे राहणारे मारोती मोहन गोरठेकर व्यवसाय मजुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 महिन्यापुर्वी 22 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आपल्या घराला कुलूप लावून कामासाठी पुढे महानगरात गेले होते. यादरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील 61 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
सखाराम ज्ञानोबा वारकड रा.संगुचीवाडी ता .कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 वाजेच्यादरम्यान त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या झाडावर चढून कोणी तरी चोरट्यानी घरात प्रवेश केला आणि घरातील गॅस टाकीच्या खाली ठेवलेले रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 85 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक नाईक अधिक तपास करीत आहेत.
बारसगाव ता.अर्धापूर येथील शेत शिवार गट क्रमांक 266 मध्ये ठेवलेली पाण्याची मोटार आणि केबल असा 50 हजार 100 रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी 24 ऑगस्टच्या सायंकाळी 7 ते 25 ऑगस्टची पहाट होण्यादरम्यान चोरून नेल्याची तक्रार मुंजाजी रामचंद्र बारसे यांनी दिली आहे. या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीस हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बकल नंबर 631 हे अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद शहरातील ताज भुसार दुकानाच्या पाठीमागे ठेवलेली चार चाकी मालवाहु गाडी क्रमांक एम.एच.04 सी.जी.9993 कोणी तरी चोरट्यांनी 22 ऑगस्टच्या सायंकाळी 7 ते 25 ऑगस्टच्या पहाटे दरम्यान चोरून नेली आहे. या गाडीची किंमत 1 लाख 25 हजार रुपये आहे. गाडी मालक अजरोद्दीन शाहीद अहेमद यांच्या तक्रारीवरुन धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलला असून पोलीस अंमलदार घेवारे अधिक तपास करीत आहेत.
गोपाल पंजाबराव कदम रा.आष्टी ता.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे आष्टी गावातून 22 ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.26 बी.जी.0541 किंमत 5 लाख रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक डुडूळे अधिक तपास करीत आहेत.
विविध चोऱ्यांमध्ये 10 लाख 91 हजारांचा ऐवज लंपास