नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कायदेशीर संपत्तीच्या स्त्रोतांऐवजी 48 लाख 43 हजार रुपये अपसंपदा जमवणाऱ्या आई-वडील आणि पुत्रास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी आज 28 ऑगस्ट रोजी जामीन नाकरला आहे त्यामुळे या तिघांनी रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.
नांदेड येथील बरबडा येथे कृषी पर्यवेक्षक या पदावर 17 वर्ष कामकाज केलेले दत्तात्रय पितांबर गिरी(59) यांच्याबद्दल नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात उघड चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान त्यांच्या नावे, त्यांच्या पत्नी छायाबाई दत्तात्रय गिरी (55) आणि मुलगा शशांक दत्तात्रय गिरी (33) यांच्याही नावावर अनेक बेहिशोबी मालमत्ता सापडल्या. या बद्दल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत त्यांना अनेकवेळा त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीबद्दल विचारणा केली असता, ते पुष्टीदायक उत्तर देवू शकले नाहीत.म्हणून त्या तिघांविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक संदीप थडवे यांनी या तिघांना अटक केली. कायदेशीर दृष्टीकोणातून काही चुक होवू नये म्हणून दि.26 ऑगस्टच्या रात्री पकडलेल्या तिघांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी गिरी कुटूंबातील आई-वडील आणि पुत्रास सोमवार दि.28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते.
आज पोलीस कोठडी संपल्यानंतर संदीप थडवे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी गिरी कुटूंबातील आई-वडील आणि पुत्राला न्यायालयासमक्ष हजर केले. पोलीसांनी विनंती केल्याप्रमाणे न्यायालयाने या तिघांना न्यायालयीन कोठडीत घेतले. त्यानंतर यांना जामीन मिळावा असा अर्ज करण्यात आला. पण त्यावर आज काही आदेश झालेला नाही. म्हणून या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी सध्या तुरूंगात पाठविले आहे.
आई-वडील-पुत्राला न्यायालयाने जामीन नाकारला