
नांदेड(प्रतिनिधी)- मे 2023 पासून मराठवाडा सर्व श्रमिक कामगार संघटनेच्यावतीने उपवनसंरक्षक वनविभाग(प्रा) नांदेड यांच्या कार्यालयासमक्ष सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका लागला आहे. रात्री 3 वाजता एका 54 वर्षीय आंदोलनकर्त्या महिलेची तब्येत बिघडली. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन 3 महिन्यापासून सुरू आहे.
मराठवाडा सर्व श्रमीक संघटनेचे निवेदन प्राप्त करून घेतलेल्या माहितीनुसार ही सर्व मंडळी कायम स्वरुपी वनविभागात कामगार आहे. शासनाच्या नियमावलीप्रमाणे आजच्या दिवशी त्यांना 447 रुपये दररोज मिळायला हवे पण प्रत्यक्षात 150 ते 200 रुपये दिले जातात. त्यांना एप्रिल 2020 पासून आजपर्यंतचे थकीत वेतन मिळाले नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे किमान वेतन दराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. किमानत वेतन कायद्याप्रमाणे हजेरी कार्ड व वेतन पावती दरमहा वेतनासोबत दिली पाहिजे. न्यायालयीन आदेशाप्रमाणे कामगारांना कामावर घेतलेच पाहिजे. सेवा ज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठ कामगारांना प्राधान्य मिळायला हवे. सर्व रोजंदारी कामगारांना भविष्य निर्वाह योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. सर्व कामगारांना ओळख पत्र मिळायला पाहिजे. औद्योगिक न्यायालय जालना यांच्या आदेशाप्रमाणे कामगारांना नोकरीत कायम केले पाहिजे. शासन निर्णय दि.10 एप्रिल 2023 प्रमाणे दरमहा वेळेवर वेतन मिळाले पाहिजे. सेवानिवृत्त केलेल्या कामगारांना 9 टक्के व्याज दराने उपदान देण्याचे आदेश असतांना सुध्दा उपदान देण्यास विलंब करून व्याज रक्कमेचा शासनावर भुर्दंड वाढत आहे.
या मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेने 29 मे 2023 पासून वेगवेगळे 15 संदर्भ जोडून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनादरम्यान अनेक महिला व पुरूष कामगार आंदोलनात भाग घेत आहेत. शासनाला आणि इतर विभागांना दिलेल्या निवेदनावर मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेचे सरचिटणीस बी.के.पांचाळ यांची स्वाक्षरी आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी 30 मे 2023 रोजी स्विकारले आहे. इतर कार्यालयात सुध्दा हे निवेदन स्विकारले आहे.
या आंदोलनात लोणी ता.किनवट येथील महिला कौशाबाई प्रल्हाद परचाके (54) या सुध्दा सहभागी झाल्या होत्या. दि.28 ऑगस्टच्या रात्री 3 वाजेच्यासुमारास त्यांची शारिरीक अवस्था बिकट झाली. तेंव्हा त्यांचे सहकारी आणि पोलीसांनी कौशाबाईला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू दुर्देवाने आंदोलनकर्त्या 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलीसांनी याबाबत जास्त दक्षता घेतली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार चिखलवाडी भागातील वनविभागासमोर ठाण मांडून बसले आहेत.तिकडे दवाखान्यात मयत झालेल्या कौशाबाई परचाके यांची वैद्यकीय प्रक्रिया पुर्ण करून घेण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक धोंडीराम केंद्रे प्रयत्नशिल आहेत.
