आज माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण दिवस होता आज भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे भेट घेतली. ओम-द ग्लोबल आर्ट सेंटरचे उदघाटन जानेवारी-मार्च 2024 या कालावधीमध्ये करण्याचा माझा मानस आहे. त्याकरीता प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रपती यांनी यावे अशी विनंती करण्याकरीता वेळ मागीतली होती. त्या निमित्ताने “ओम’ ची संपूर्ण संकल्पना त्यांच्यासमोर मांडायची होती.
बैठक निच्छित झाल्यापासुन एक गोष्ट सतत माझ्या डोक्यात घोळत होती की, पृथ्वी तलावर सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या व अनेक अर्थांनी संपूर्ण जगात महान असणाऱ्या आपल्या भारत देशाच्या सर्वोच्य पदावरील व्यक्तिसोबत बोलताना आपण नेमके काय बोलावे? किती बोलावे? कसे बोलावे? येवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वासमोर बोलताना जास्त पान्हाळ लावता येत नाही मोजकेच बोलायचे तर मग संपूर्ण विषय त्यांचेपर्यंत पोहोचला पण पाहिजे. नेमके काय बोलायचे काय सोडायचे हा यक्ष प्रश्न होता. बऱ्याच विचार मंथनानंतर व काही मित्रांशी चर्चा केल्यानंतर, मी पाच सहा मुद्दे निच्छित केले होते ज्यात, महाराष्ट्रातील व देशातील दृष्य कलेचा इतिहास, आजची परिस्थिती, तरूण कलावंतासमोरील आव्हाने, मुंबईत पर्यायाने महाराष्ट्रात असलेली दृष्यकला केंद्राची आवश्यकता, व त्या धर्तीवर ओम-द ग्लोबल आर्ट सेंटरची निर्मिती. या मुद्यांचा त्यात समावेश होता.

त्यासोबतच मी राष्ट्रपती मुर्मू च्या जीवन प्रवासाचा देखील थोडासा अभ्यास केला होता. अनंत अडचणींवर खंबीरतेने मात करत जीवन जगताना त्यांनी देशसेवा सर्वोच्च मानली. शांत व संयमी स्वभावाच्या धनी असणाऱ्या जर कुठे गोर गरीबांवर, वंचीतांवर अन्याय होत असेल तर अत्यंत कठोर व खंबीर भुमिका घेतलेल्या आहेत. शोषीतांवर त्यांनी कधीच अन्याय होऊदिला नाही. अत्यंत मेहणती व प्रामाणीक जीवनशैलीने मार्गक्रमन करत त्या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या आहेत
आज त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर, त्यांची अत्यंत साधी पण आश्वासक अशी देहबोली पाहिल्यावर व त्यांचे प्रेमळ शब्द कानावर पडल्यानंतर मी बोलण्याकरीता ज्या मुद्द्यांची तयारी करून गेलो होतो ते सर्व आपसुकच बाजुला ठेवले गेले आणि ऐनवेळी माझ्या अंतर्ममाने जे सुचवले ते बोलायला लागलो, मी छोट्याशा खेडेगावातुन मिळेल ते काम करून स्वावलंबनातुन माझे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात तिन सुवर्ण पदकं मिळवली. पण पहिल्यांदा मुंबईला आलो तेंव्हा आर्ट गॅलरी मध्ये जायची देखील मला भीती वाटायची.चित्र किंवा शिल्प यांचे कलेक्शन करणे म्हणजे श्रिमंतांची कामे असतात या धनिक लोकांपर्यंत माझ्यासारखा गाव खेड्यातुन आलेला कलाकार कसा पोहोचणार? खासगी गॅलरीज मोजक्याच कलावंतांना मोठं करतात मला कोणत्याही गॅलरीने जवळ येऊदिले नाही परंतु मी जीद्द सोडली नाही, प्रामाणिक व सातत्यपूर्ण परिश्रम घेत राहीलो, मुंबई सोडली नाही, मला 10-12 वर्ष परिश्रम केल्यानंतर सुर मिळाला. ग्रामिण कलावंतांना मुख्यप्रवाहात आणले पाहिजे. कारण कलावंत जगला तर कला जगेल व कला जगली तर संस्कृती जगेल. संस्कृती ही देशाची ओळख असते, तीचा ऱ्हास म्हणजे आपल्या अस्तित्वाचा ऱ्हास होणे होय. माझ्या सारख्या खेडेगावांतुन, छोट्या शहरांतून येणाऱ्या काही कलावंताकरीता तरी माझा हातभार लागावा, त्याच बरोबर भारतीय कला, संस्कृति आंतरराष्ट्रीय पातळींवर ठळकपणे मांडता यावी या करीता ओम-द ग्लोबल आर्ट सेंटर उभारत आहे. त्याचे उद्घाटन आपल्या शुभहस्ते व्हावे. त्याला राजाश्रय मिळावा या भावनेसह आपल्या भेटीकरीता आलो आहे.
महामहीम राष्ट्रपती यांना माझी कल्पना खरोखरच आवडली. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी तर दर्षवलीच पण सेंटरचे काम पूर्ण झाल्यावर उद्घाटनाकरीता देखील येणार असल्याची ग्वाही दीली.
ही भेट शक्य झाली ती आदरणीय डॅा. हिना गावीत यांच्या म्हणजेच आमच्या हिनाताईंच्या पुढाकाराने. संसद सत्र संपल्यानंतर मतदार संघांतील नियोजीत कामांत व्यस्त असताना देखील खास माझ्याकरीता हिनाताई दिल्लीला आल्या काही गोष्टी आभार शब्दात न मावणाऱ्या असतात तसेच आहे हे! राष्ट्रपतींची ही आजची भेट माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण पान आहे आणि ते हिनाताईंनी त्यांच्या हाताने लिहीले ताई, आपल्या ऋणांत हे आयुष्य आहे कारण आज सारखे प्रसंग हे शब्दांत मांडणे शक्य नसते ते प्रसंग फक्त अनुभवायचे, मनसोक्त जगायचे असतात.
– चित्रकार, डॉ. नरेंद्र बोरलेपवार