नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील शक्तीपिठ आणि ज्योर्तिलिंग यांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. मी या ठिकाणी कोणतेही शक्ती प्रदर्शन व राजकीय भाष्य करण्यासाठी आले नाही. मही वर्षातून चार वेळा शक्तीप्रदर्शन करते त्यामुळे मला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही. माझ्या मागे शिव आणि शक्ती या दोन्हीचाही आशिर्वाद आहे, असे मत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
शिवशक्ती परिक्रमाची सुरूवात नांदेड जिल्ह्यातील माहुर येथे रेणुकादेवीच्या दर्शनाने करण्यात आली. दि.30 रोज बुधवारी विशेष विमानाने नांदेड विमानतळावर आगमन झाले. तेथून माहुर येथील रेणुकादेवीच्या दर्शनासाठी जात असतांना त्या पत्रकारांशी बोलत असतांना म्हणाल्या.
यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, देविदास राठोड, व्यंकटेश साठे, प्रविण पाटील चिखलीकर, पुनम पवार, दिपकसिंह रावत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. मुंडे यांच्यासोबत माजी मंत्री माधव जानकर हेही उपस्थित होते. पंकजा मुंडे यावेळी बोलतांना म्हणाल्या की, श्रावण महिन्यात राज्यातील शक्तीपिठ आणि ज्योर्तिलिंग यांच्या दर्शनासाठी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. याची सुरूवात माहुर येथील रेणुकादेवीपासून केली आहे. आज मी कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही असे म्हणून त्यांनी राजकीय भाष्य मात्र टाळले.