स्थानिक गुन्हा शाखेने ट्रक चालकाचा मारेकरी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या शिल्लक राहिलेल्या 62 दिवसांमध्ये सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी एका बाहेर राज्यातील ट्रक चालकाचा खून करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
पोलीस काळातील शेवटचे तीन महिने सुट्टी घेण्याची प्रथा आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना काही जणांनी 2 हजार मोदकांची ऑफर देवून सुट्टीवर जाण्यास सांगितले होते. परंतू त्यांना या ऑफरला नकार दिला आणि आपले कर्तव्य पार पाडण्यात लक्ष घातले. काही महिन्यांपुर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बाहेर राज्यातील ट्रक चालक आपली ट्रक घेवून जात असतांना मारतळा शिवारातील पेट्रोल पंपासमोर त्याच्याकडील रक्कमेची लुट करण्याच्या कारणावरुन त्या ट्रक चालकाचा खून करण्यात आला होता. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नसतांना सुध्दा आपल्या पोलीस सेवेतील कसबांचा वापर करून ट्रक चालकाचा खून करणारा गुन्हेगार सचिन उर्फ बोबड्या बापूराव भोसले (25) रा.कुरूळा ता.कंधार ह.मु.ताडपांगरी जि.परभणी यास ताब्यात घेवून ट्रक चालकाच्या खूनाची माहिती काढली असता सचिन उर्फ बोबड्याने मीच खून केल्याचे कबुल केले. ट्रक चालकाचा खून करणाऱ्या सचिन उर्फ बोबड्याला पुढील तपासासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, गंगाधर कदम, बालाजी तेलंग, रुपेश दासरवाड, देवा चव्हाण, सचिन जिंकलवाड, धम्मा जाधव, ज्वालासिंघ बावरी आणि मारोती मुंडे यांचे या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *