
नांदेड(प्रतिनिधी)-अवैध घर पाडण्याची धमकी देवून 20 हजार रुपये मागणाऱ्या स्थानिक संस्था कर विभागातील लिपीक तथा अतिरिक्त कार्यभार क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजिराबाद आणि त्याच्या सहकाऱ्यास विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 4 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल रात्री इतवारा पोलीस ठाण्यात अत्यंत उशीरा दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार एका फिर्यादीला तुझे घर बेकायदेशीर आहे, त्यासाठी तुला घर पाडावे लागेल. हे घर पाडण्याचे काम गिरीश काठीकर हे करतात त्यांचे कार्यालय गांधी पुतळ्याजवळील पाण्याच्या टाकीखाली आहे. त्यांना जावून भेट असे सांगण्यात आले. काठीकरने त्याचे घर न पाडण्यासाठी 20 हजार रुपये मागितले. याच कामात टिपु सुलताननगरमधील एक व्यक्ती मिर्झा अफजल सहभागी झाला आणि तो तक्रारदाराला सांगत होता की, तुझे काम 40 ते 45 हजार रुपयांचे आहे पण काठीकर साहेब 20 हजार रुपयांत करत आहेत. असे सांगत काल दि.2 सप्टेंबरच्या रात्री मिर्झा अफजल बेग शमशोद्दीन बेग (54) याने गिरीश चिंताहरी काठीकर यांच्यावतीने 20 हजार रुपयांची लाच स्विकारताच त्या दोघांना अटक करण्यात आली.
व्हिडिओ…..
आज दुपारी पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात गिरीश काठीकरच्यावतीने ऍड.पत्की यांनी बाजू मांडली तर दुसरा आरोपी अफजल बेगच्यावतीने ऍड.साजिद यांनी बाजू मांडली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोघांना 4 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गिरीश काठीकर यांना सन 2022-23 या वर्षात मागील वर्षापेक्षा दुप्पट म्हणजे 23.32 कोटी एवढी विक्रमी मालमत्ता वसुली केली होती. त्यासाठी त्यांना अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी प्रशसतीपत्र देवून गौरव केला होता.मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये काय-काय होत असते हे आम्ही लिहिण्याची गरज नाही.
मिळालेल्या पोलीस कोठडीमध्ये लाच लुचपत विभागाने गिरीश चिंताहरी काठीकर यांची कायद्याला अभिप्रेत चौकशी केली तर यांच्या अनेक जागी असलेल्या बेनामी भागिदाऱ्या, इतरांकडे असलेल्या अवैध व बेहिशोबी मालमत्ता सुध्दा समोर येतील.
आज न्यायालयात बहुतांश महानगरपालिका अवतरली होती. कारण गिरीश काठीकर हे सर्वांचेच लाडके आहेत. त्यामुळे त्यांना काही होवू नये या अपेक्षेतून ही गर्दी जमली होती पण कायद्याच्या प्रक्रियेत कायदा हा सर्वात मोठा असतो हे आज गिरीश काठीकर आणि त्याचा सहकारी मिर्झा अफज बेगला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर स्पष्ट झाले.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/09/03/मनपा-क्षेत्रीय-कार्यालय/