नांदेड(प्रतिनिधी)-फिरायला घेवून जातो म्हणून खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना आरोपीने 2 लाख रुपयांची मागणी केल्यानंतर समोर आली. यानंतर मुलाच्या आईने तात्काळ पोलीस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलीसांनीही या घटनेकडे गांभीर्याने पाहुन जलदगतीने चक्र फिरवले आणि मुलासह अपहरण कर्त्या आरोपीस बासर रेल्वे स्थानकाहून ताब्यात घेतले.
तामसा येथील रहिवाशी गीतांजली शंकर कडवाने वय 29 यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनूसार दि.2 रोजी तामसा येथील आरोपी सुनिल दिगंबर कडवाने वय 25 याने फिर्यादीच्या सात वर्षीय मुलास फिरायला नेतो, असे सांगून घेऊन गेला. यानंतर मुलाचे अपहरण करून तु माझ्या फोन पे वर दोन लाख रूपये पाठव नाहीतर तुला तुझा मुलगा दिसू देणार नाही, अशी धमकी देऊन फोन कट केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सपोनि मुंजाजी दळवी यांनी स्वतः तपास करीत सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेत नांदेड, धर्माबाद व बासर येथे या मुलाचा शोध घेतला. तसेच सायबर सेलची मदत घेत खंडणीखोर आरोपी सुनिल कडवाने यास बासर रेल्वे स्थानक येथे पकडून अपहरण झालेल्या मुलास ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्परता दाखवून केवळ सात तासात यातील आरोपीस पकडून गजाआड केले. सदर मुलास वैद्यकीय तपासणी करून त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, खंडेराय धरणे, सहा. पोलिस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुंजाजी दळवी, पोउपनि सरोदे, गंगाप्रसाद दळवी, पोहेकॉ राजेंद्र सिटीकर, पोना दिपक ओडणे, गुंडेवार, पोकॉ गोदने यांनी ही कामगिरी केली.
अल्पवयीन मुलास पळवून नेणाऱ्या आरोपीस काही तासातच गजाआड