

नांदेड(प्रतिनिधी)-मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज हल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने नांदेड बंदचे आवाहन करून मोर्चा काढला होता. या मोर्चाला व्यापारी व इतर सर्वांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवत या बंदमध्ये सहभागी झाले होते. सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना मागण्याचे निवेदन दिले.
सोमवारी सकाळी 11 वाजेच्यासुमारास राजकॉर्नर येथून मोर्चास सुरूवात झाली. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवासह इतरही समाजातील नागरीक या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा राज कॉर्नरपासून निघाला. श्रीनगर येथे आल्यानंतर मोर्चातील काही जणांनी दगडफेक केली तर याच भागात माजी आ. अमरनाथ राजूरकर मोर्चात सहभागी झाले होते. मात्र मोर्चाकरांच्या रोषाला आ.राजूरकरांना समोरे जावे लागले आणि त्यांनी या मोर्चातून माघार घेतली. त्यांच्यासोबत आ.मोहनअण्णा हंबर्डे यांनाही मोर्चाकरांनी सहभागी होवू दिलिे नाही. याचबरोबर हा मोर्चा शिवाजीनगर भागात आल्यानंतर याही ठिकाणी दगडफेक झाली. पुढे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येवून पोहचला. यानंतर यातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांना संयुक्त निवेदन दिले.

यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैणात करण्यात आला होता. वर्कशॉप कॉर्नर येथे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रत्यक्ष येवून पाहणी केली. या मोर्चात अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैणात होते. ड्रोनच्या माध्यमातून मोर्चावर प्रशासनाची करडी नजर होती. किरकोळ प्रकार सोडला तर मोर्चा संपूर्णपणे यशस्वी पार पडला.
