नांदेड(प्रतिनिधी)-बेघरांच्या पत्रकार सोसायटीमध्ये आता बेघर पत्रकार शिल्लक राहिलाच नाही. कारण यामध्ये आमदार आणि इतर अधिकाऱ्यांनी बेघर पत्रकारांपासून भुखंड खरेदी करून आपल्या तीन-तीन मजली इमारती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे खरा पत्रकार कोण आणि बेघर पत्रकार कोण आणि बेघर पत्रकारांचे भुखंड लाठले कोण? हा एक विषय कायम स्वरुपी अनुत्तरीत राहणार आहे.
मौजे असद्दुलाबाद येथे सन 2002 मध्ये अध्यक्ष बहुभाषिक पत्रकार सहवास गृहनिर्माण संस्था यांच्या नावाने नांदेडच्या सर्वसामान्य नागरीकाच्या मालकीची दोन एकरपेक्षा जास्तीची जागा या बेघर पत्रकारांनी आम्ही निवारा नसलेले व्यक्तीमत्व आहोत म्हणून लाठली. तत्कालीन महानगरपालिकेतील दानशूर कर्णांनी ही जागा बेघर पत्रकारांना दिली. या बेघर पत्रकारांनी त्याचा धंदा केला. धंदा करण्यामध्ये पत्रकार सर्वात पुढे असतात. कारण आम्हीच धंदा करू शकतो, आम्हीच राजकारण चालू शकतो, आम्हीच प्रशासनाला चालवतो असा एक गौड गैरसमज या धंदेवाईक पत्रकारांमध्ये आहे. त्याप्रमाणे हा प्रकार घडला. आणि तेथे वेगवेगळे भुखंड तयार करण्यात आले. या जागेचा नगर भुमापन क्रमांक 9693 असा आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 21708.50 चौरस मिटर आहे. यामध्ये 2002 नंतर अनेक फेरफार करण्यात आले आहेत. या फेरफाराची कायदेशीर स्थिती काय आहे याची संपूर्ण माहिती मिळाली नाही.
या भागात आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपले घर बनवले. त्याबद्दल वास्तव न्युज लाईव्ह आणि इतरांनी सुध्दा त्या चुकीच्या कामकाजाबद्दल बातम्यांना प्रसिध्दी दिली होती. आमदार माधवराव पाटील यांनी इतर पत्रकारांचे लिहिले वृत्त विसरले परंतू वास्तव न्युज लाईव्हकडून त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न त्यांनी ऑगस्ट 2023 मध्ये एकदा केला. परंतू त्यांना यश आले नाही. त्यांनी तर आता न्यायालयात जाऊन तेे कसे पत्रकार आहेत हे दाखवून स्थगिती आदेश मिळवला आहे. त्यामुळे सध्या त्यांचे घर पाडले गेले नाही. महानगरपालिका सुध्दा आज प्रशासनाच्या हातात आहे. डॉ.महेशकुमार डोईफोडे हे अत्यंत कडक प्रशासक असतांना सुध्दा या बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये अनेक बेकायदेशीर कामे सुरू आहेत.
जगाला दारु पाजवून जगाचे भले करण्यामध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या महाभागाने तर बेकायदेशीर रित्या जलतरणीका उभारली आहे. या बेघर पत्रकार सोसायटीच्या शेजारीच विमानतळ प्राधिकरण आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या परवानगी सुध्दा येथे गजर असते. ती त्यांनी घेतली होती की नाही हाही विषय तसाच पडून आहे.
नव्यानेच या बेघर पत्रकार सोसायटीमध्ये भुखंड क्रमांक 20 हा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात कापुस संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने घेतला आहे. या भुखंड क्रमांक 20 च्या भुखंडाचे क्षेत्र 148 चौरस मिटर आहे. पवन कृष्णराव ठोके या नावाने हे भुखंड बहाल करण्यात आले आहे. हा भुखंड बाहल करणारा बेघर पत्रकार कोणी तरी देसाई असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी गगनचुंबी इमारत तयार होते आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या इमारतीपेक्षा जास्त मोठी इमारत त्या भुखंड क्रमांक 20 वर तयार होत आहे. म्हणजे आमदारापेक्षा अधिकारी सरस ठरला असेही म्हटले तर चुक ठरणार नाही. महानगरपालिका आणि विमानतळ प्रशासन यांची परवानगी आहे काय? हा ही विषय अनुत्तरीत आहे.
अशा प्रकारे बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये चालू असलेले बेकायदेशीर काम सध्याचे प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी तरी पाहावे कारण आज ते स्वयंभू आहेत. सर्वसामान्य माणसाच्या मालकीची जागा फुकटात वाटली गेली आहे. ती जागा पुन्हा सर्वसामान्य माणसाची कशी करता येईल यावर काही तरी कायदेशीर मार्ग डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी शोधावा अशी या शब्दप्रपंचाद्वारे नांदेडकरांची विनंती आहे.