जिल्हा उपनिबंधकाने विभागीय निबंधकांना पाठवला प्रस्ताव
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांनी बनावट एटीएममधून शेतकऱ्यांचे पैसे गायब होतात या संदर्भाने दिलेल्या तक्रारीबाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूरकडे जिल्हा उपनिबंधक देशमुख यांनी जिल्हा बॅंकेच्या 63 शाखांमधील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी व्हावी आणि दोषीवर कार्यवाही व्हावी असा प्रस्ताव सादर केला आहे. सोबतच विजय सोनवणे यांनी गृहमंत्री महाराष्ट्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुध्दा शेतकऱ्यांच्या या फसवणूकीबाबत वेगवेगळ्या तक्रारी केल्या आहेत.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा उमरी येथे विजयदादा सोनवणे यांच्या पत्नी सौ.निशा सोनवणे यांच्या नावाचे बॅंक खाते आहे. या बॅंक खात्यावर त्यांनी एटीएम कार्ड घेतले नाही. मागील महिन्यात शासनाचे अनुदान आल्यानंतर ते उ चलण्यासाठी त्या बॅंकेत गेल्या तेंव्हा बॅंकेने सांगितले की, तुमची रक्कम एटीएम कार्डद्वारे उचलली गेली आहे. या संदर्भाने झालेले तक्रारीनंतर उमरी शाखेचे व्यवस्थापक राजपूत यांना निलंबित करण्यात आले परंतू सध्या ते गोळेगाव येथे कार्यरत आहेत असे सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जवळपास 63 शाखा आहेत. या 63 शाखांमध्ये एटीएमचा घोळ झालेलाच आहे. याबाबत नांदेड येथील जिल्हा उपनिबंधक विश्र्वास देशमुख यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांना एक प्रस्ताव पाठविला आहे.
या प्रस्तावानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 63 शाखांमध्ये बोगस एटीएम तयार करून हजारो शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातून परस्पर करोडो रुपयांची रक्कम उचल करून हडप केलेल्या रक्कमेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी 63 बॅंक शाखेतील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी होवून चौकशी अंती द ोषींवर कार्यवाही करण्यात यावी असे या प्रस्तावात नमुद आहे.
बॅंकेत कार्यरत असलेल्या कोअर बॅंकींग प्रणालीसह अंमलात असलेल्या डिजिटल प्रणालीशी संबंधीत आहे. या कार्यालयाने यापुर्वी बॅंकेच्या डाटा सेंटरबाबत सादर केलेला अहवाल दि.24 एप्रिल 2023 प्रमाणे बॅंकेजवळ पुरेसे तांत्रिक ज्ञान असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा अभाव स्पष्ट केला होता. त्यामुळे बॅंकेत कार्यरत असलेल्या डिजिटल, सायबर यंत्रणेचे बॅंकेच्या, शासनाच्या व ठेवीदारांच्या निधीच्या सुरक्षीततेसाठी फोरेन्सीक ऑडीट सक्षम यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे. म्हणून उचीत सक्षम यंत्रणेकडून हे फोरेन्सीक ऑडीट व्हावे अशी शिफारस आम्ही करत आहोत.
यासोबतच विजयदादा सोनवणे यांनी प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्य गृहमंत्री यांच्यासह प्रवर्तन निदेशालयाकडे सुध्दा या संदर्भाचे अर्ज दिले आहेत. यामध्ये उमरी पोलीस ठण्यात सौ.निशा विजय सोनवणे यांचे 19 हजार 800 रुपये बोगस यंत्रणेद्वारे गायब झाल्याचे लिहिले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील शेतकऱ्यांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी झटत आहेत आणि इकडे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शेतकऱ्यांची रक्कम बोगस एटीएमद्वारे लुटण्याची तयारी करत आहे. या निवेदनावर विजयदादा सोनवणे, गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर, बालाजी धनसरे, संजय भालेराव, सचिन सांगवीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विजयदादा सोनवणे यांनी सांगितले की, कॉंगे्रसचे नेते मंडळी या अर्जाचया चौकशीमध्ये काही काम होवू नये असा दबाव आणत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रत्येक शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी असे जे बोगस एटीएम दिले आहेत. त्याची शोध मोहिम राबवत आहेत आणि तुमचे पैसे काही दिवसात तुम्हा देवू असे कोरडे आश्र्वास देत आहेत. मुळात एक गुन्हा घडला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भाने चौकशी होवून दोषींवर कार्यवाही होणे अपेक्षीत असतांना आता शोध मोहिम राबवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक काय साध्य करणार आहे असा प्रश्न विजयदादा सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे फोरेन्सीक ऑडीट होणार