परभणीतून बालकाचे अपहरण ; खून करून माळेगावच्या तलावात फेकले; दोन मारेकरी गजाआड 

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मित्राच्या लहान भावाला पळवून नेऊन त्याचा खून करणाऱ्या दोन जणांना परभणी पोलीसांनी चोरवड ता.पालम येथून ताब्यात घेतले आहे. मारेकरी आणि मयत मुलगा यांच्या कुटूंबाचे आपसात जूने संबंध आहेत.
कृषीसारथी कॉलनी वसमत रोड परभणी येथील बालक परमेश्र्वर प्रकाश बोबडे (14)याला दोन अज्ञात लोकांनी शाळेसमोरून दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पळवून नेले. याबाबत नवा मोंढा पोलीस ठाणे परभणी येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 34 नुसार गुन्हा क्रमांक 323/2023 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र मुंडे यांच्याकडे देण्यात आला. परभणी पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात या बालकाचा तपास सुरू असतांना विविध तांत्रीक बाबींचा आधार घेण्यात आला. त्यात अपहरण झालेला मुलगा परमेश्र्वर याचा मोठा भाऊ ज्ञानेश्र्वर यास मोबाईल चॅटींगवर अपहरण करणाऱ्यांनी पैसे मागितले होते. ज्ञानेश्र्वर आणि अपहरण करणारे दोघे पाच वर्षापुर्वी एकाच शाळेत शिकत होते. एका अपहरणकर्त्याने परमेश्र्वरचा मोठा भाऊ ज्ञानेश्र्वर यास 35 हजार रुपये दिले होते. तो परत करत नव्हता. याचाही राग अपरणकर्त्यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी परमेश्र्वर बोबडेचे अपहरण केले. त्याला अगोदर चोरवड तालुका पालम येथे नेले त्यानंतर त्याला माळेगाव ता.लोहा येथे नेऊन त्याचा खून करून त्याला दगडाला बांधून तलावात फेकून दिले. या प्रकरणाचा शोध लावण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.टी.नांदगावकर, पोलीस अंमलदार नागनाथ मुंडे, पंकज उगले यांच्यासह पालमचे पोलीस निरिक्षक गाडेवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक कारावार पोलीस अंमलदार शिंगेवाडी, टोम्पे आणि सायबर पोलीस विभाग परभणी यांनी परिश्रम घेतले. एका अल्पवयीन बालकाला पळवून त्याचा खून करणाऱ्या आरोपींना पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक शशिकांत महावरकर, परभणीच्या पोलीस अधिक्षक रागसुधा यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *