6 लाख 78 हजार रुपये किंमतीचे 113 ग्रॅम सोन्याचे दागिणे जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर येथे कार्यरत असतांना झालेल्या 7 चोऱ्यांपैकी एकही चोरी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती यांना उघड करता आली नव्हती. सध्या नव्याने स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्त सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांच्या साथीदारांनी नांदेड ग्रामीण, पोलीस ठाणे मुखेड, पोलीस ठाणे उस्माननगर, पोलीस ठाणे नायगाव येथील चार घरफोड्या उघकीस आणून 6 लाख 78 हजार रुपयांचे दागिणे जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हा शाखाने पकडलेला आरोपी सोलापूर जिल्ह्यात खून आणि दरोडा करून फरार सुध्दा आहे.
नांदेडच्या उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत गजब सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती कार्यरत असतांना एकूण 7 घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील एकही घरफोडी त्यांना उघडकीस आणता आली नाही. त्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी त्यांना मिळालेल्या माहितीबद्दल आपले पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सांगितले. चिखलीकर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेवून रवि वाहुळे यांना कामगिरीवर पाठविले तेंव्हा त्यांनी बिलोली टोल नाक्याजवळ सापळा रचून अमरिश उर्फ आमऱ्या दुर्गा काळे (45) रा.जेऊर ता.अक्कलकोट जि.सोलापूर ह.मु.दगडपुर ता.बिलोली जि.नांदेड यास पकडले. त्याने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील गुन्हा क्रमांक 568/2022, पोलीस ठाणे उस्माननगरचा गुन्हा क्रमांक 74/2023, पोलीस ठाणे मुखेडचा गुन्हा क्रमांक 53/2023 आणि पोलीस ठाणे नायगाव येथील गुन्हा क्रमांक 125/2022 हे चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. पोलीसांनी या चोरट्याकडून घरफोडीत चोरी गेलेल्या ऐवजापैकी 113 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 6 लाख 78 हजार रुपयांचे जप्त केले. अमरिश उर्फ आमऱ्या दुर्गा काळेने सोलापूर जिल्ह्यात सुध्दा खून आणि दरोडा करून फरार असल्याची माहिती सांगण्यात आली. सध्या अमरिश उर्फ आमऱ्या दुर्गा काळेला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे आदींनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदरावजी मुंडे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव करले, संजीव जिंकलवाड, देवा चव्हाण, बालाजी यादगिरवाड, ज्वालासिंग बावरी, रणधिर राजबन्सी, गजानन बैनवाड, शंकर केंद्रे, घुगे, मुंडे आणि हनुमानसिंह ठाकूर यांचे कौतुक केले आहे.
बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित घरफोडीचे गुन्हे स्थानिक गुन्हा शाखेने उघड केले