
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमधील प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी यांची हत्या करणाऱ्या दोन जणांपैकी एकाला नांदेड पोलीसांनी हस्तांतरण वॉरंटवर पंजाब येथून पकडून आणले आहे. त्यास विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात अगोदर 16 जणांना अटक झाली होती. त्यापैकी दोन जणांविरुध्दचा मकोका कायद्या संपुष्टात आला होता आज पकडून आणलेल्या 23 वर्षीय युवकाविरुध्द एनआयएने अटक केली होती. त्याला मॉडेल जेल चंदीगड येथून नांदेडला आणण्यात आले आहे. या प्रकरणातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक अद्यापही अटक करणे बाकी आहे.
दि.5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 11.15 या वेळेदरम्यान संजय बियाणी यांच्या घरासमोर राज बंगलो सन्मीत्रनगर नांदेड येथे 22 सेकंदात एक हत्याकांड घडले. त्या दिवशी आपल्या चार चाकी वाहनात बसून संजय बियाणी हे बाहेरून आले. सीसीटीव्हीमध्ये दिसते त्याप्रमाणे ड्रायरव्हरच्या सीट मागून संजय बियाणी खाली उतरले त्या गाडीचा क्रमांक एम.एच.26 बी.क्यु.0500 असा होता. त्या दिवशी त्या गाडीचा चालक सिध्देश्र्वर तोंडारे हा व्यक्ती होता. गाडीतून बाहेर येतांना संजय बियाणीच्या हातात फोन होता आणि ते बोलवर बोलतच गाडीच्या पाठीमागून आपल्या घराकडे जाऊ लागले. त्या क्षणाअगोदर काही क्षण पुर्वी त्यांच्या चार चाकी गाडी समोर एक दुचाकी येवू उभी राहिली. त्या गाडीवर दोन जण खाली उतरले ज्यांनी आपल्या तोंडाला कपडे बांधलेले होते. पळतच ते दोघे संजय बियाणीसमोर आले. फोन बोलणाऱ्या संजय बियाणीला आपल्यासमोर कोणी येत आहे याची कल्पना येण्याअगोदरच आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. संजय बियाणी खाली पडल्यावर सुध्दा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि हे मारेकरी पळून जात असतांना त्या गाडीच्या चालकावर सुध्दा गोळ्या झाडल्या. 22 सेकंदात एका माणसाचा जीव अशा प्रकारे गेला होता. पोलीस अभिलेखात असे सांगितले गेले आहे की, हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणजितसिंघ संधू याने 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातील खंडणीची काही रक्कम देण्यात आली होती आणि काही उर्वरीत रक्कम शिल्लक होती आणि ती रक्कम देत नाही म्हणूनच संजय बियाणीवर हल्ला घडविण्यात आला होता.
आजचा कोर्टातील व्हिडीओ….
संजय बियाणीवरील हल्ला अत्यंत पुर्व नियोजित होता त्यासाठी रिंदाने पाठवलेले दोन जण नांदेडला आले होते. त्यांनी नांदेडच्या अनेक युवकांसोबत मिळून संजय बियाणी यांची रेकी केली होती. पुढे त्यातील एक पळून गेला होता आणि मग दुसरा आला असे सांगण्यात येते. संजय बियाणीला मारल्यानंतर काही जणंाना पोलीसांनी अटक केली. त्यांची नावे मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे, सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल, इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरकसिंघ मेजर, हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाना सतनामसिंघ बाजवा, गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल, करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु, हरदिपसिंघ उर्फ हर्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे, कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार, हरीश मनोज बाहेती, रणजित सुभाष मांजरमकर, सरहानबिन अली अलकसेरी, गुरप्रितसिंघ उर्फ दान्या उर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा, कमलकिशोर गणेशलाल यादव, सुनिल उर्फ दिपक पिता सुरेश, दिव्यांश उर्फ पहेलवान रामचेत अशी नावे या प्रकरणात आरोपी या सदरात आहेत. त्यापैकी सर्वात प्रथम नाव टोळीप्रमुख म्हणून हरविंदसिंघ उर्फ रिंदा याचे आहे. सध्या रिंदा हा पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जाते. त्याने एक वृत्तवाहिणीला एक मुलाखत सुध्दा दिली होती.
आरोपी सदरात नाव असलेल्या प्रत्येकाचा रोल आहे. ज्या रोलमुळे संजय बियाणी यांचे हत्याकांड सहज घडले. दरम्यान एनआयएने दिपक उर्फ दिपुना उर्फ सुनिल सुरेशकुमार रंगा (23) रा.सुरखपुर ता.जि.झज्जर राज्य हरियाणा याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. याच दोघांनी संजय बियाणीवर गोळ्या झाडल्या होत्या. सोबतच या दोघांनी मिळून हरीयाणा राज्यात पंजाब पोलीसांच्या गुप्तहेर विभाग कार्यालयावर बॉम्बने हल्ला केला होता. सोबतच अमृतसर येथील एका रुग्णालयात यांनी खून केला होता.
संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता संजय बियाणी यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा क्रमांक 119/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 201(ब), 34, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 27/2, 3/1 (आय), 3(2), 3(4) सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 सोबत कलम 13,16,17, 18, 20, 23 बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम 1967, युपीपी कायदा अशी कलमे जोडण्यात आली. या प्रकरणातील आज आणलेला आरोपी दिपक उर्फ दिपुना (23) हा मॉडेल जेल हरियाणा येथून हस्तांतरण वॉरंटवर आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, फड, पोलीस अंमलदार राजकुमार डांगरे आदी पंजाबला गेले होते आणि त्यांनी दिपक उर्फ दिपुना यास नांदेडला आणले. 10 सप्टेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सर्वप्रथम लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांनी केला. पुढे हा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक बिलोलीचे अर्चित चांडक यांच्याकडे गेला. त्यानंतर देगलूर उपविभागाचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी या घटनेचा तपास केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्याकडे आहे.
या प्रकरणातील सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर

आज पोलीस उपनिरिक्षक फड, पोलीस अंमलदार साहेबराव, क्युआरटीचे जवान आदींनी दिपक उर्फ दिपुना यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील ऍड.यादव तळेगावकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयासमक्ष मांडल्यानंतर न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी दिपक उर्फ दिपुना यास दहा दिवस 21 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बियाणी हत्याकांडात समाविष्ट असलेला एक विधीसंघर्षग्रस्त बालक अद्यापही एनआयएच्या ताब्यात आहे. त्याची बाल न्यायामंडळासमक्ष चाचणी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्याला सुध्दा नांदेडला आणण्यात येईल. या सर्व प्रकरणात नांदेड पोलीसांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्यासारखे आहे.
घटनेचा व्हिडीओ….