बैल पोळा सणानिमित्त गोवर्गीय पशुधनास एकत्रित येण्यास सक्त मनाई

  • पशुपालक व शेतकऱ्यांनी बैल पोळा सण घरगुती स्वरूपात साजरा करावा

नांदेड (जिमाका) – प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनास बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सर्व पशुपालक व शेतकऱ्यांनी 14 सप्टेंबर रोजी असलेला बैल पोळा सण घरघुती स्वरुपात साजरा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील एकूण 16 तालुक्यातील 197 ईपीसेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच गोवर्गीय पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे.  14 सप्टेंबर रोजी बैल पोळा सणानिमित्त मोठया संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आदेशान्वये गोवर्गीय पशुधन बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *