नांदेड (प्रतिनिधी) -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक पुरस्कार वितरण आणि वार्षिक कार्यक्रम नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली. अध्यक्षीय समारोप करताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत ‘अमृत कलश’ स्थापन करून त्यामध्ये नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मुठभर माती एकत्रित करण्याचे काम या विभागाने अतिशय उत्साहात आणि राष्ट्रभक्ती जोपासत केले आहे. या अमृत कलशची प्रेरणा घेऊन गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रभक्तीची चेतना निर्माण करावी आणि वृक्षरोपणा बरोबरच पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, समाजाचे सुदृढ आरोग्य जोपासावे असे मत व्यक्त केले. यावेळी कुलगुरू महोदयांनीं ‘पंचपप्रण’ ची सामूहिक शपथ सर्व उपस्थिताना दिली.
या समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे राज्य सल्लागार डॉ. राजेश पांडे म्हणाले की, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीसाठी चेतना निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनाच्या परिसस्पर्शाने कोणतेही काम हाती घेतले तर त्याचे सोने होते. त्याप्रमाणे ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमात संपूर्ण भारतीयांनी सहभागी होऊन गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, व वेगवेगळ्या राज्यातील मूठभर माती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘अमृत कलश’ मध्ये संकलित करून आपणास राजधानी दिल्ली येथे सुंदर अशी अमृतवाटिका तयार करावयाची आहे. त्याचबरोबर हे मूठभर माती हातामध्ये घेऊन देशभक्तीची चेतना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करावयाची आहे. त्यासाठी आपण ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमात सहभागी होऊन सेल्फी काढावा, तो लिंक वर अपलोड करावा. अशा पद्धतीचा उपक्रम सर्व स्तरातून राबविला गेला तर निश्चितपणे हा उपक्रम म्हणजे विश्वविक्रम होईल यात शंका नाही, त्या दृष्टीने सर्व कार्यक्रमाधिकारी समन्वयक व स्वयंसेवक यांनी आपल्या परिसरातील नातेवाईक, कुटुंबातील व्यक्ती त्यांचा फोटो काढून तो अपलोड केला तर विश्वविक्रम होईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले तर मंचावर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्राचार्य संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संतराम मुंडे, डॉ. प्रशांत पेशकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जवाहरलाल नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक श्रीमती चंद्राकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य संजय चाकणे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने ‘मेरी माटी मेरा देश’, पंचप्रण, अमृत कलश, अमृत कुंडी, अमृत वाटिका, अमृतवण यासारखे उपक्रम राबवित आहे. त्याचबरोबर या उपक्रमाला लाखोंच्या संख्येने दररोज मुटभर माती घेतलेला फोटो अपलोड केला तर निश्चितपणे आपण विश्वविक्रम करून आणि हा अमृत कलश जागतिक दर्जाचा बनऊ असे मत व्यक्त केले.
यावेळी नवनियुक्त जिल्हा समन्वयक नांदेड जिल्हा डॉ. अमोल काळे, लातूर जिल्हा डॉ. केशव आलगुले, हिंगोली जिल्हा डॉ. सचिन हटकर, परभणी जिल्हा डॉ. अरुण पडघन यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. तसेच २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
दुपारच्या सत्रामध्ये अहमदनगर येथील प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. गोकुळदास गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांना वार्षिक नियोजन कसे करावे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच युनिसेफच्या मुंबई येथून आलेल्या अर्शिया मॅडमनी मानसिक संतुलन याविषयी मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमास रा. से. यो. माजी संचालक डॉ. डी. डी. पवार, डॉ. नागेश कांबळे, डॉ. शिवराज बोकडे, नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर येथील रा. से. यो. जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक व कार्यक्रमाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. केशव आलगुले, डॉ. अरुण पडघन यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. भागवत पस्तापुरे, डॉ. तुकाराम फिसे यांनी मानले.