किरण वाठोरे
नांदेड -शहरात वाहतुकीसाठी पर्याय म्हणून तयार करण्यात येणारा कॅनॉल रोड परत एकदा तोडून तयार करण्यात येत आहे. यामुळे कॅनॉल रोडचे काम वर्षानुवर्षे पहावयास मिळत आहे. या रस्त्याने वाहतूक कमी करण्यासाठी फायदा होणे, सोडून यामुळे उलट वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
मागील दहा वर्षापुर्वी कॅनाल रोड तयार करण्यास सुरूवात झाली. सुरूवातीच्या तीन ते चार वर्षात कॅनॉल रोडचे काम पुर्ण झाले. त्यावेळी रोड हा डांबराने तयार करण्यात आला होता. काही महिन्यांनी पावसामुळे परत रोड खराब झाला आणि नंतर परत एकदा डांबराने रोड तयार करण्यात आला. परंतु पावसाचे पाणी येथे तयार केलेल्या नाल्यामध्ये साचून पावसाळ्यामध्ये पूर्णपणे नाली रस्त्यावर जमा होऊ लागले. यासाठी प्रशासनाने परत एकदा रोड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आता हा रस्ता सिमेंट-काँक्रीटने बनवला जात आहे. या रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू असून जुना रस्ता तोडण्यासाठी रस्त्यावर मोठमोठे जेसीबी रस्त्याच्या एक बाजूला असून रस्ता पूर्णपणे तोडण्यात येत आहे. एका बाजूच्या रस्त्याचे काम असल्यामुळे परत नागरिकांना वाहतुकीचा सामना सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वर्षानवुर्षे एकच रस्त्याचे सुरू असून एकाच रस्त्यासाठी प्रशासनाच्या पैशांची आणि वेळेची वाट लागली जात आहे. या रस्त्यावर मोठमोठ्या जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू असून दुसऱ्या बाजूने वाहनांची ये-जा होत असते. रस्ता फोडण्याचे काम सुरू असल्याने दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनधारकांना मार लागण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना ज्या रस्त्याने वाहतुकीचा पर्याय निर्माण होणार होता, आता त्याच रस्त्यामुळे नागरिकांना परत एकदा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवार या रस्त्यावर बाजार भरत असतो, त्या दिवशी नागरिकांचे काय हाल होत असतील, याबद्दल न बोललेच बरे. रस्त्याचे काम चांगले व एकाचवेळी पूर्ण करून रस्ता उपयोगात आणावा अशी मागणी येथील नागरिकांतून केली जात आहे.